
सामना ऑनलाईन । मॉस्को
इंग्लंडवरील विजयानंतर क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिचने ब्रिटिश मीडियाला चांगलेच झापले. आयटीव्हिला विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना लुका म्हणाला, ब्रिटिश मीडियाने प्रतिस्पर्धी संघाबद्दल बोलताना त्यांना योग्य तो आदर द्यायला हवा. इंग्लंडमधील अनेक पत्रकार आणि फुटबॉल क्षेत्रातील पंडित वाटेल त्या भाषेत चर्चा करत होते. अनेकांनी आम्हाला कमी लेखले आणि तिथेच त्यांची मोठी घोडचूक झाली. प्रसारमाध्यमे काय बोलत होती आणि लिहीत होती याकडे आमचे लक्ष होते. त्यामुळेच संघ म्हणून मैदानात उतरताना आम्ही विचार केला की चला, आज बघूयात कोण थकतंय! म्हणजेच आम्ही मैदानात थकतो की प्रसारमाध्यमे टीका करून थकतात हे सामन्याचा निकालच सांगेल. प्रत्यक्ष सामन्यात आम्ही आमची ताकद दाखवून दिली. मानसिक आणि शारीरिक स्तरावर आम्ही इंग्लंडच्या संघाला पुरून उरलो. खूप काळानंतर क्रोएशियाचे स्वप्न साकार झाले आहे. आम्ही अंतिम फेरीत धडक मारून क्रोएशियाच्या फुटबॉल इतिहासातील आजपर्यंतचे सर्वात मोठे यश मिळविले आहे, असेही लुकाने सांगितले.

























































