
सामना ऑनलाईन । अॅमस्टरडॅम
लुकास मौराने केलेल्या शानदार गोलच्या हॅटट्रिकच्या जोरावर टोटेनहॅम हॉटस्पर या संघाने बुधवारी मध्यरात्री आयएक्सला 3-2 अशा फरकाने पराभूत केले आणि चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. मानाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची त्यांची ही पहिलीच खेप. आता 1 जून रोजी होणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत टोटेनहॅम हॉटस्परसमोर लिव्हरपूल संघाचे आव्हान असणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर इंग्लंडमधील दोन क्लबमध्ये अजिंक्यपदाची झुंज तमाम फुटबॉलप्रेमींना पाहायला मिळणार आहे.
मॅनयु-चेल्सीनंतर…
याआधी 2007-08 साली झालेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत मँचेस्टर युनायटेड व चेल्सी या दोन इंग्लंडमधील क्लब्समध्ये अंतिम लढत झाली होती. त्यावेळी मँचेस्टर युनायटेडने स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर आता लिव्हरपूल व टोटेनहॅम हॉटस्पर यांच्यामध्ये फायनल रंगणार आहे. लुकास मौरा याने उत्तरार्धात केलेल्या तीन गोलच्या जोरावर टोटेनहॅम हॉटस्परला अंतिम फेरीपर्यंत वाटचाल करता आली. त्याने 55, 59 व 96व्या मिनिटाला नेत्रदीपक गोल केले.
अवे गोलच्या आधारावर आगेकूच
टोटेनहॅम हॉटस्पर व आयएक्स यांच्यामधील सेमी फायनलच्या पहिल्या लेगमधील लढतीत आयएक्सने 1-0 अशी बाजी मारली होती. दुसऱया लेगमधील लढतीतही त्यांचा संघ अखेरच्या काही क्षणांपर्यंत 3-2 अशा एकूण गोलफरकाच्या आधारावर आघाडीवर होता, पण 96व्या मिनिटाला लुकास मौराने जबरदस्त गोल करून टोटेनहॅम हॉटस्परसाठी मोलाची
कामगिरी बजावली. दोन्ही संघांमध्ये दोन लढतींनंतर 3-3 अशी बरोबरी झाल्यानंतर सरस अवे गोलच्या जोरावर टोटेनहॅम हॉटस्परने घोडदौड केली.





























































