विजय मल्ल्याच्या आलिशान विमानाचा ३५ कोटींमध्ये लिलाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशातील बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावून पळून गेलेल्या विजय मल्ल्या याच्या लक्झरी जेट विमानाचा लिलाव झाला असून ते ३५ कोटी रुपयांना विकलं गेलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१३मध्ये जप्त झाल्यानंतर हे ए३१९ जेट विमान मुंबई येथील विमानतळावरच होतं. मुंबई उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर या विमानाचा लिलाव केला गेला. मार्च २०१६पासून हे विमान विकण्याचे चार वेळा प्रयत्न झाले. या प्रयत्नांमध्ये एक कोटीपासून ते १५२ कोटी इतकी बोली लावली गेली होती. अखेर चार अयशस्वी प्रयत्नांनंतर फ्लोरिडास्थित एका एव्हिएशन मॅनजमेंट कंपनीने हे विमान ३४.८ कोटी रुपयांना खरेदी केलं.

airbus_acj318

२५ सीट्स असलेलं हे विमान अतिशय आलिशान आणि अत्याधुनिक आहे. या विमानात घरासारखं इंटिरिअर असून एकदा इंधन भरल्यानंतर ते मुंबई ते अमेरिका असा थेट प्रवास करू शकतं. मल्ल्या या विमानाचा वापर घर आणि कार्यालयाप्रमाणे करत असे. या जेटमध्ये कॉन्फरन्स हॉल आणि मीटिंग रूमही उपलब्ध आहे. या विमानाची मूळ किंमत २६६ कोटी इतकी आहे. मल्ल्याने जेव्हा हे विमान खरेदी केलं होतं, तेव्हा मनासारखं इंटिरिअर बनवून घेण्यासाठी त्याने सुमारे चार कोटी डॉलर्स या विमानावर खर्च केले होते. त्यामुळे या विमानात सोफा, बेड, बार, शॉवर इत्यादी सोयीसुविधाही उपलब्ध आहेत.