सोशल मीडियावर माधवी लता यांचे कौतुक, ‘चिनाब’ पुलाच्या उभारणीत ‘स्त्री’ शक्तीचे बळ

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू-कश्मीरमधील चिनाब नदीवर बांधण्यात आला. नुकतेच त्याचे शानदार उद्घाटन झाले. हा सुमारे नदीतळापासून 395 मीटर उंच आणि 1315 मीटर लांब पूल आहे. त्याच्या डिझाईनमध्ये प्रा. जी. माधवी लता यांच्या योगदानाची चर्चा होतेय. माधवी लता यांनी मात्र या चिनाब पुलाचे श्रेय घेण्यास विनम्रतापूर्वक नकार दिला. पुलाचे श्रेय त्यांनी इंडियन रेल्वे आणि कन्स्ट्रक्शन कंपनी एफकॉनला दिले. माधवी लता इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथे सिव्हिल इंजिनीअर विभागाच्या प्राध्यापक आहेत. चिनाब रेल्वे पुलाच्या प्रकल्पात त्या प्रमुख जिओ टेक्निकल कन्सलटंट होत्या. 2021 साली त्यांना बेस्ट वुमेन जिओटेक्निकल रिसर्च ऍवॉर्ड मिळाले होते. 2022 मध्ये स्टेम ऑफ इंडियाच्या टॉप 75 महिलांमध्ये त्यांचा समावेश होता. डॉ. माधवी यांनी सस्टेनेबल सॉईल स्टेबिलायजेशन, अर्थक्वेक इंजिनीअरिंग यावर संशोधन केलेय. चिनाब प्रोजक्टवर त्यांनी 17 वर्षे काम केले. चिनाब पुलासाठी आयफेल टॉवरपेक्षा चारपट जास्त स्टील वापरलंय. हा पूल ताशी 260 वेगाने वाहणाऱया वाऱयाचा मारा झेलू शकतो. भूकंपातही डगमगणार नाही. तिथल्या पर्वतांची स्थिती पाहून त्याचे डिझाईन करण्यात आलेय.