मध्य प्रदेश पोटनिवडणुकीतील बेताल

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावर लस कधी मिळते याकडे संपूर्ण मानवजातीचे लक्ष लागलेले आहे. अशीच एखादी जालीम लस बेताल बोलणाऱया राजकीय नेत्यांसाठीही असायला हवी, अशी धारणा सध्या समाजात वाढीस लागत आहे.

नेत्यांनी बोलण्याचा ताळतंत्र सोडल्याची अनेक उदाहरणे नजीकच्या काळात बघायला मिळतील. मात्र मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीत तिथले माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एकेकाळी त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या इमरतीदेवी यांना उद्देशून ‘आयटम’ असे संबोधल्याने काँग्रेस जिंकत असलेल्या मध्य प्रदेशातील पोटनिवडणुका हरते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ यांनी वर्षभर चांगले सरकार चालवले. मात्र ऐन प्रचारावेळी त्यांची जीभ घसरली. त्यावर कमलनाथ यांनी खुलासा केला असला तरी ‘जो बूंद से गयी वो हौद से नही आती’, याचा प्रत्यय काँग्रेसला येऊ शकतो.

लोकसभा निवडणुकीवेळीही सिधीच्या खासदार रीती पाठक यांच्या विरोधात काँग्रेसच्या अजयसिंग यांनी अत्यंत अशोभनीय वक्तव्य केले होते. त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. आता कमलनाथ यांनी ऐन मोक्याला हा ‘आयटम’ केल्याने काँग्रेसला फटका बसू शकतो. मात्र त्याच वेळी इमरतीदेवींनीही कमलनाथांवर पलटवार करताना त्यांच्या कुटुंबीयांवर अशोभनीय भाषेत टीका केल्याने बेताल शेरेबाजीची लढाई सध्या बरोबरीवर सुटल्याचे दिसत आहे. त्यात बिसाहूलाल नावाच्या भाजपच्या एका मंत्र्यांनी बेताल धरला आहे. त्या मुळे मुख्य मुद्दे बाजूला ठेवून एकमेकांविरोधात झालेल्या शिवीगाळीमुळेच ही पोटनिवडणूक लक्षात राहील.

आपली प्रतिक्रिया द्या