मध्य प्रदेशच्या हमीदिया रुग्णालयात अग्नितांडव, 4 अर्भकांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे हमीदिया रुग्णालयात सोमवारी रात्री आग लागली. या रुग्णालयातील बालरुग्ण विभागात लागलेल्या आगीत चार अर्भकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

या वॉर्डमध्ये एकूण 40 अर्भकं होती. त्यापैकी 36 अर्भकांना वाचवण्यात यश आलं आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणी शोक व्यक्त करत याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच चौहान यांनी मृत अर्भकांच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपये नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देखील ही घटना भीषण असल्याचं म्हटलं आहे.

सोमवारी रात्री नऊच्या सुमाराला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या बाळांच्या वॉर्डला अचानक आग लागली. ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 10 गाड्या बोलवण्यात आल्या. बालरुग्ण विभागातून 36 अर्भकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. मात्र, चार अर्भकांचा मृत्यू झाला.

या घटनेवेळी रुग्णालयातील स्थिती भयंकर झाली होती. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी अर्भकांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, उलट ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पसार झाले, असा आरोप मृत अर्भकांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.