
मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या दंगलीनंतर ज्या व्यक्तींचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी एका लवादाची नेमणूक करण्यात आली होती. या लवादाने दंगलीमुळे बाधित लोकांच्या तक्रारीच्या आधारे काही जणांना नोटीस जारी केली होती. यामध्ये हिंदू तसेच मुस्लिम दोन्ही बाजूच्या व्यक्तींचा समावेश आहे. लवादातर्फे ज्या व्यक्तींना नोटीस मिळाली आहे त्यामध्ये एका 12 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. जर लवादाने दिलेल्या नुकसान भरपाईच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली तर या मुलाकडून 2.90 लाख रुपये वसूल केले जातील.
10 एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील खरगोन इथे दंगल भडकली होती. राम नवमीच्या दिवशी निघालेल्या शोभायात्रेदरम्यान ही दंगल भडकली होती. या दंगलीनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घोषणा केली होती की ज्यांनी दंगली दरम्यान दगडफेक केली असेल, जाळपोळ केली असेल आणि नासधूस केली असेल त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल केली जाईल. यानंतर एका लवादाची स्थापना करण्यात आली होती ज्यांच्यासमोर सामान्य नागरिकांनी त्यांच्या नुकसानीचा तपशील सादर केला होता. 25 ऑगस्ट 2022 रोजी एका महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे 12 वर्षांच्या मुलाला नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटिसीवर मुलाच्या घरच्यांनी दावा केला आहे की, जेव्हा दंगल झाली होती तेव्हा हा मुलगा घरी नव्हताच. ही नोटीस पाहिल्यानंतर हा मुलगा घाबरला असून तो पोलिसांच्या दहशतीमुळे आजारी पडल्याचं त्याच्या आईने म्हटलं आहे.
ज्या मुलाला नोटीस पाठवण्यात आली आहे त्याच्या वडिलांचे नाव कालू खान आहे. त्यांच्याकडूनही लवादातर्फे 4 लाख रुपयांची नुकसान भरपाईचे आदेश देण्यात आले आहेत. कालू खान यांनी दावा केला आहे की जेव्हा दंगल भडकली होती, तेव्हा ते घरात झोपलेले होते.



























































