
मध्य प्रदेशमधील सिधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीच्या चेहऱ्यावर भाजपच्या कार्यकर्त्याने लघुशंका केल्याची घटना ताजी असताना आता मध्य प्रदेशातील आणखी एका व्हिडीओने खळबळ उडाली आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करुन त्याला तळवे चाटायला भाग पाडले जात आहे.
मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते अरूण यादव यांनी ट्वीट करत हा व्हि़डीओ शेअर केला आहे. त्यात लिहीलेय की, शिवपुरी नंतर आता डबरा ग्वाल्हेरचा व्हिडीओ समोर आला आहे. अरुण यादव यांनी पुढे लिहीले आहे की, मध्यप्रदेशात गुंडगिरी सुरुच आहे, दलित आदिवास्यांवरील अत्याचारानंतर अल्पसंख्यांकांना कारमध्ये अपहरण करुन शिवीगाळ केल्या, चपलांनी मारले आणि तळवे चाटायला भाग पाडले. हे प्रकरण गृहमंत्री यांच्या डबरा क्षेत्रातील असून आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
काही दिवसांपूर्वी पीडित तरुणाचे डबरा येथील गोलू गुर्जर याच्या भावासोबत भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर तो बनमोर येथे जाऊन काम करु लागला होता. त्यानंतर आरोपीने ग्वाल्हेर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एका ओळखीच्या व्यक्तीला फोन केला आणि पीडित तरुणाला बोलावले, येथून बोलेरोमधून त्याचे अपहरण केले, त्यानंतर त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. व्हायरल व्हिडिओनंतर पोलीसही अलर्ट मोडवर आले आहेत. आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. लवकरच आरोपींची ओळख पटवून त्यांना पकडण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मप्र में गुंडागर्दी जारी है, दलित-आदिवासियों के अत्याचार के बाद अब अल्पसंख्यक को कार में किडनैपिंग कर भद्दी गालियां दी चप्पलों से पीटा और तलवे चटवाए ।
मामला गृह मंत्री के गृह क्षेत्र डबरा का है,
आरोपी पुलिस की पकड़ से बाहर है ।
नरोत्तम मिश्रा को अपने पद से इस्तीफा दे देना चाहिए । pic.twitter.com/VdsY9trsVf— Arun Subhash Yadav 🇮🇳 (@MPArunYadav) July 8, 2023
मध्य प्रदेशातील सीधीचे प्रकरण चांगलेच तापले असताना, ग्वाल्हेर येथील डबरा येथून एक नवीन व्हिडिओ समोर आल्याने लोकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. लघुशंका प्रकरणात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी या प्रकरणातील पीडित दशमत रावत याला त्यांच्या निवासस्थानी भेटायला बोलावले. त्यानंतर चौहान यांनी रावत यांचा आदर सत्कार करून त्यांचे पायही धुतले. तसेच झालेल्या घटनेसाठी त्यांनी रावत यांची माफीही मागितली. हे प्रकरण निवळत असताना आता पुन्हा एकदा नवा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.


























































