
आपल्या कलेच्या माध्यमातून मनोरंजन तसेच मनोरंजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या कलाकार आणि लोककलावंतांवर कोरोनाच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे. या कलावंतांना संघटित करून त्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचविण्यासाठी महा कला मंडल या शिखर संघटनेची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे.
राज्यात 20-20 किमीच्या अंतरावर बोलीभाषा, अन्न संस्कृतीप्रमाणे लोककलाही बदलते. कोकणातील दशावतरापासून ते विदर्भातील झाडेपट्टी, खेळेमेळे सादर करणाऱ्या लोककलाकार आणि तंत्रज्ञांची संख्या लाखोंच्या घरात आहे. पण हे सारे असंघटित असल्यामुळे शासन दरबारी असलेल्या सोयी सुविधांपासून ते वंचित राहतात. त्यातच कोरोनामुळे पाच महिन्यापासून उत्पन्नाचे स्त्रोतच बंद झाल्यामुळे या कलाकारांची अवस्था फार बिकट झाली आहे. या सर्व मंडळींना एकत्रित आणण्याचे शिवधनुष्य महा कला मंडलने पेलले आहे. आतापर्यंत 115 हून अधिक संघटना आणि त्याअंतर्गत तीन लाखांपेक्षा अधिक कलाकारांची माहिती गोळा केली आहे.
महाकला मंडल ही केवळ एक संस्था किंवा संघटना नसून राज्यातील सर्व लोककलावंत, वाद्यवृंद कलाकार, नाट्यकलावंत, पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ मंडळींना एका छताखाली आणून त्यांच्या न्याय-हक्कासाठी लढणारी संघटना असेल, असे संघटनेचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी मुंबईत सांगितले. यावेळी अभिनेते सुशांत शेलार, निमंत्रक उदय साटम, मुकेश उपाध्ये, संतोष लिंबोरे, मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ, लावणी महासंघ, रजनी कलावंत सामाजिक सांस्कृतिक संस्था आदी विविध कला संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.




























































