…म्हणून मिंधे गटाच्या खासदारांना रोखले! विनायक राऊत यांनी स्पष्ट केले कारण

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मिंधे गटाच्या खासदारांना रोखण्यामागचे कारण शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. गेले दोन दिवस आम्ही सीमाभागातील कानडी अत्याचाराविरुद्ध संसदेत आवाज उठवत असताना मिंधे गटाचे खासदार गप्प बसले होते. त्यावेळी त्यांना महाराष्ट्राची एकी असायला हवी असे वाटले नाही. मग आता शहा यांच्याकडे चमकोगिरी करायला ते येणार असतील तर त्याला आम्ही आक्षेप घेणारच असे राऊत म्हणाले.

देशाचे गृहमंत्री राज्य आणि देशाच्या हिताचा निर्णय घेतील सुप्रिया सुळे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या मुद्यावर सुरू असलेल्या सर्व घडामोडींचा माहिती आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिली. त्याची त्यांनी नोंद घेतली आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की गुजरातचा शपथविधी झाल्यानंतर काहीतरी मार्ग काढतील. त्यामुळे माझा विश्वास आहे की, या प्रकरणात लवकरात लवकर केंद्राचा हस्तक्षेप होईल, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. आमचा विश्वास आहे की, देशाचे गृहमंत्री पक्षपात करणार नाहीत आणि राज्याच्या व देशाच्या हिताचं जे असेल तसा निर्णय ते घेतील. आता पुढील आठवडय़ात काय होतं हे पाहूया, असेही त्या म्हणाल्या.

सन्मवयाने तोडगा काढण्याचे आश्वासन अमोल कोल्हे

अमित शहांनी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांची बाजू संवेदनशीलपणे ऐकून घेतली. परस्पर समन्वयाने तोडगा काढू, असं आश्वासन शहांनी दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी गृहमंत्री 14 डिसेंबरला चर्चा करणार असल्याचं कळलं. त्यामुळे समन्वयातून मार्ग निघेल. बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी येथील मराठी भाषिकांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. त्यांच्यावर कानडी वरवंटा फिरवला जातोय, यावर कुठेतरी चाप बसून दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे,’ असेही कोल्हे म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याची नोंद घेतली

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढल्याने महाराष्ट्रात संतप्त भावना आहे. राज्यपालांनी याविषयी अद्यापपर्यंत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही याकडे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने अमित शहा यांचे लक्ष वेधले. यावर, मी राज्यपालांच्या विधानाची नोंद घेतलीय, असे सूचक उद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले.

…आणि मिंधे गटाचे खासदार हात हलवत परत गेले

कर्नाटक सरकारच्या दादागिरीविरोधात संसदेत आणि संसदेबाहेर महाविकास आघाडीचे खासदार आवाज उठवत असताना एरव्ही मूग गिळून गप्प बसणाऱ्या  मिंधे गटाच्या खासदारांनी राजकीय श्रेयासाठी अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सपशेल अपयशी ठरला. महाविकास आघाडीचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करत असतानाच मिंधे गटाच्या श्रीरंग बारणे आणि  धैर्यशील माने यांनी अमित शहा यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाविकास आघाडीच्या खासदारांचा आक्रमक नूर आणि अमित शहा यांचा एपंदरीत मूड पाहून चमकोगिरीसाठी आलेल्या बारणे व माने यांना काढता पाय घ्यावा लागला.