भाजप हा जातीजातीमध्ये भांडणे लावणारा पक्ष; आई शपथ सांगतो, कमळाला मतदान नको महादेव जानकर यांनी स्पष्टच सांगितले

भाजप हा भांडणे लावणारा पक्ष आहे. त्यामुळे कुणालाही मतदान करा; मात्र, आईशपथ सांगतो, कमळाला मतदान करू नका, असे माजी मंत्री व रासप नेते महादेव जानकर यांनी जाहीर सभेत स्पष्टच सांगितले.

जतमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, भाजप दोन समाजच नव्हे तर जाती जातीमध्ये भांडणे लावणारा पक्ष आहे. दोघांच्यात भांडणे लावून आपला स्वार्थ साधण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. त्यांना गरज असेल तेव्हा ते अगदी विरोधकांनाही पायघडय़ा घालायला कमी करत नाहीत, मात्र, वेळ निघून जाताच पायाखाली घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे या लोकांना निवडणुकीत साथ देऊ नका, असे आवाहन जानकर यांनी केले.

भानगडी केल्या नाहीत म्हणून मी वाचलो

भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची आज काय अवस्था केली आहे हे आपण पाहतो. तशी माझीही अवस्था करण्याचा प्रयत्न होता, मात्र, मी वाचलो कारण मी काही भानगडीच केल्या नाहीत, असे जानकर म्हणाले.

जतच्या लोकप्रतिनिधींचे हिंदूत्व ठेकेदारीसाठी – विशाल पाटील

जतच्या लोकप्रतिनिधींचे हिंदूत्व हे केवळ मंत्रीपद व ठेकेदारी मिळवण्यासाठी असल्याची टीका खासदार विशाल पाटील यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केली. अगोदर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यांच्याबाबत भाई-भाई म्हणणारे मुख्यमंत्र्यांना खूष करण्यासाठी हिंदूत्वनिष्ठ असल्याचा आव आणत आहेत. केवळ स्वार्थासाठी आपले गाव सोडून जतमधून उमेदवारी घेतली. जत तालुक्याचा विकास व्हावा असा यामागे उद्देश नव्हता, तर केवळ मंत्री पद आणि ठेका मिळावा यासाठी निवडणूक लढवली आणि या तालुक्याचे दुर्दैव त्यांचा विजय झाला, असा विशाल पाटील म्हणाले.