
राज्यामध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा झपाटय़ाने सुरू झाला आहे. राज्यातील 10 मंत्री आणि 20पेक्षा जास्त आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मुंबई, पुणे शहरांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या दोन्ही शहरांत रुग्ण वाढू लागले की, राज्यातील इतर ठिकाणी त्याचा प्रसार होतो. त्यामुळे मुंबई, पुणे शहरातील वाढत्या कोरोनाची आकडेवारी पाहून कटू निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
1 जानेवारीनिमित्त कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असून, तिसऱया लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाबाबत कालच नवीन नियमावली जाहीर केली असून, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे. लग्न समारंभाबरोबरच, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम मोठय़ा स्वरूपात व्हावेत, असे प्रत्येकाला वाटते. मात्र, कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग वेगाने होत असल्याची बाब लक्षात घ्यायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
तूर्त लॉकडाऊनचा निर्णय नाही, रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध वाढणार
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज दुपटीने वाढत आहे. परिस्थिती गंभीर असल्यामुळे निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या लॉकडाऊनची गरज नाही मात्र रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढल्यास निर्बंध आणखी कठोर केले जातील, अशी स्पष्टोक्ती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. लॉकडाऊन नसले तरी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. झपाटय़ाने वाढणारी रुग्णसंख्या पाहून तिसऱया लाटेची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स व आरोग्य विभागाची बैठक घेतली. या बैठकीत समोर आलेले चित्र चिंताजनक आहे. तरी नागरिकांनी काळजी करू नये. नागरिकांनीही नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे राजेश टोपे म्हणाले.
































































