
अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सीईटीची वेबसाईट लुडकली आहे. दहावी निकालाच्या दिवशी बोर्डाच्या वेबसाईटवर झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर विद्यार्थ्यांना संध्याकाळपर्यंत ऑनलाइन निकाल पाहता आला नव्हता. बोर्डाच्या वेबसाईटवरील सर्व्हर बिघाडाची समस्या अकरावी सीईटीचा ऑनलाइन प्रवेश अर्ज भरतेवेळीही निर्माण झाली आहे. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना सीईटीचा अर्ज भरता आलेला नाही.
दहावी निकालाच्या वेबसाईटप्रमाणे अकरावी सीईटीच्या वेबसाईटसाठीही राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आऊटसोर्सिंग केले आहे. वेबसाईटचे काम पाहणाऱया खासगी कंपनीच्या सर्व्हरवर लोड आल्याने पहिल्याच दिवशी सीईटीच्या वेबसाईटनेही मान टाकली आहे. या बिघाडाबाबत बोर्डाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अनेक विद्यार्थी वारंवार अर्ज भरण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र वेबसाईटवरील ‘ऑप्लिकेशन एरर’ या मेसेजमुळे त्यांना प्रवेश अर्ज भरताच आलेला नाही.
सीईटी देणाऱया विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन
अकरावी प्रवेशासाठी सीईटी देणाऱया विद्यार्थ्यांना सीईटीचा ऑनलाइन अर्ज भरताना काही अडचणी असल्यास तसेच परीक्षेसंदर्भात काही शंका असल्यास त्या सोडविण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागनिहाय हेल्पलाइन सुरू केली आहे. मुंबई विभागीय मंडळातील विद्यार्थी मुंबई विभागीय शिक्षण सचिव राजेंद्र अहिरे, सहाय्यक सचिव नीलम ढोके, वरिष्ठ अधिक्षक एस. एस. फाटक यांच्याशी अनुक्रमे 9423933435, 9869086061, 9869433816 या क्रमांकावर किंवा [email protected] या वेबसाईटवर संपर्क साधू शकतात.
दहावीत तांत्रिक विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना अडचणी
दहावीत तांत्रिक विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना अकरावीची सीईटी देताना अडचणी येण्याची भीती शिक्षक परिषदेने व्यक्त केली आहे. एनएफक्यूएफच्या अभ्यासक्रमानुसार मेपॅनिकल टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी हे विषय दहावीत घेतलेल्या विद्यार्थ्यांना हिंदी किंवा सामाजिक शास्त्र यांपैकी एका विषयात दहावीच्या परीक्षेत सूट दिली जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सीईटीत सामाजिक शास्त्र्ा विषयाचा अभ्यास करताना अडचणी येण्याची शक्यता आहे. सदर विद्यार्थ्यांची सीईटी घेताना सामाजिक शास्त्र या विषयाचे 25 गुण वगळून केवळ 75 गुणांची सीईटी घेण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.




























































