लेख : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची त्रिदशकपूर्ती

123

>>अविनाश पाटील<<

अंधश्रद्धा निर्मूलनापासून वैज्ञानिक दृष्टिकोनापर्यंत आणि विवेकवादापासून मानवतावाद समाजात निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने तीन दशकांच्या वाटचालीचा प्रवास करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. तो पुरेसा आणि तेवढा प्रभावी नाही याची समितीला जाणीव आहे, परंतु तरीही जे काही झाले, घडले, घडविण्याचा प्रयत्न केला त्याचा उपयोग समाजाला सुखीसमृद्ध करण्यासाठी झाला की नाही याचे अवलोकन व साक्षेपी मूल्यमापन होणे आवश्यक वाटते. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आघाडीवर गत तीस वर्षांत विविध भौगोलिक, धार्मिक, जातीय समूहांच्या व वर्गांच्या मानसिकतेत काही बदल झाला असेल आणि समाज चमत्कार, बुवाबाजी, अंधश्रद्धा, शोषण करणाऱ्या रूढीप्रथा, कालबाह्य सणउत्सव यांच्यापासून काही प्रमाणात परावृत्त झाला असेल तर ते समितीच्या कार्याचे यश म्हणता येईल.

पुरोगामी आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राच्या उभारणीत संत-समाजसुधारकांनी दिलेली दिशा मार्गदर्शक आहे. जवळपास 150 वर्षांचा विविध समाजसुधारकांचा कार्यकर्तृत्वाचा वस्तुपाठ आपल्याला मिळाला आहे, जो देशात विरळा आहे आणि अनुकरणीयदेखील आहे. मात्र अशा शोषणमुक्त, समताधिष्ठत, कालसुसंगत समाज उभारणीसाठी प्रयत्न होण्याऐवजी आपण नंतरच्या काळात प्रतीके, प्रतिमा, प्रदेश, भाषा, खानपान, वेशभूषा, केशभूषा, चालीरीती, सण-उत्सव, यात्रा-जत्रा, रूढी-प्रथा-परंपरांच्या अस्मितांमधे अडकून पडलो आहोत का? असा प्रश्न पडतो. या सर्व प्रकारच्या अस्मितांचे अस्तित्व मान्य करूनही त्यांची सीमारेषा काय? ही सर्व मिळून असणारी ‘संस्कृती’ वा सांस्कृतिक वास्तवच आपण पुढे घेऊन जाणार आहोत का? त्यांना तपासण्याची, चिकित्सा करण्याची आणि बदलविण्याची कसोटी, निकष काय असू शकतील? अशा संभ्रमित, संक्रमित वातावरणात आपली वाटचाल सुरू आहे. त्यामधून बाहेर पडण्यासाठी आणि वर्तमानाची आव्हाने पेलून भविष्याचा वेध घेण्यासाठी नव्या पिढीला सारासार विचार करण्याची, तर्कसुसंगत निर्णय घेण्याची अशी विवेकी जीवनपद्धती अनुसरणे आवश्यक आहे. त्यासाठी काम करणाऱ्या सर्व छोटय़ा मोठय़ा संस्था, संघटना व व्यक्तींना संरक्षण आणि पाठबळ देण्याचे काम नवमहाराष्ट्रात किती होते यावर महाराष्ट्राचे पुरोगामीत सिद्ध होणार आहे.

anis

अस्मितांच्या समाजकारणातून पक्षीय व निवडणुकीच्या राजकारणाकडे प्रवास करण्याची सध्या चलती आहे. त्यासोबतच सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करूनदेखील पक्षीय व निवडणुकीच्या राजकारणात करता येतो असा काहीसा आदर्शवत वाटणारा वारसादेखील महाराष्ट्राला मिळालेला आहे. त्यामधे पुरोगामी परिवर्तनवादी विचारसरणीच्या विविध प्रवाहांनी आपला अमीट ठसा उमटविलेला आहे. तो आता विस्मृतीत तर टाकला गेलाच, पण तो तथाकथित मुख्य प्रवाहाकडून निंदनीयदेखील ठरविला आहे. त्यांनी आपापल्या जागी पाय रोवून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अविरत, चिकाटीचे प्रयत्न केले याची नोंद इतिहासाने घेतलेली दिसत नाही.

अशा प्रक्रियेतून महाराष्ट्रातील विविध समाज समूहांचे आणि घटकांचे लहान-मोठे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असणारे सर्व व्यक्ती, गट, समूह, संस्था, संघटना, चळवळ यांचा महाराष्ट्राच्या वाटचालीत, प्रतीत, विकासात किमान ‘खारीचा’ का होईना वाटा आहेच!

तो काय राहिला हे अभ्यासपूर्ण तयारीने महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. जेणे करून संवैधानिक लोकशाही-प्रजासत्ताक व्यवस्थेतील देखील हेतुपुरस्सर निर्माण झालेले भ्रम-भास व मिथके दूर व्हायला, संपायला मदत होईल.

तसेच सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यरत व्यक्ती, संस्था, संघटना, चळवळी हे ‘लष्कराच्या भाकरी’ थापायचे काम म्हटले जात असले तरी ते वांझोटं, निरर्थक, रिकाम टेकडय़ांचे काम नाही तर त्या उलट ते समाजाला, समाजातील विविध स्तरांवरील घटकांना मानवतेने, सामाजिक न्यायाने, स्वातंत्र-समता-बंधुभावाने जगायला अनुकूलता, संधी व अवकाश उपलब्ध करून देण्यासाठीचे पायाभूत काम आहे याची दखल सर्वांनी घेणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्या तीस वर्षांच्या संघटित कामाच्या वाटचालीचा लेखाजोखा महाराष्ट्र राज्याच्या षष्ठाrब्दीवर्षानिमित्ताने जनमानसापुढे मांडायचा प्रयत्न करणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनापासून वैज्ञानिक दृष्टिकोनापर्यंत आणि विवेकवादापासून मानवतावाद समाजात निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने तीन दशकांच्या वाटचालीचा प्रवास करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. तो पुरेसा आणि तेवढा प्रभावी नाही याची समितीला जाणीव आहे, परंतु तरीही जे काही झाले, घडले, घडविण्याचा प्रयत्न केला त्याचा उपयोग समाजाला सुखी-समृद्ध करण्यासाठी झाला की नाही याचे अवलोकन व साक्षेपी मूल्यमापन होणे आवश्यक वाटते. त्याच भूमिकेतून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आघाडीवर गत तीस वर्षांत केल्या गेल्या विविध भौगोलिक, धार्मिक, जातीय समूहांच्या व वर्गांच्या मानस बदलामधे आणि चमत्कार, बुवाबाजी, अघोरी-अमानुष अंधश्रद्धा, अन्याय शोषण करणाऱ्या रूढी-प्रथा-परंपरा, कालबाह्य सण-उत्सव यांच्यापासून काही प्रमाणात परावृत्त करण्यामध्ये निश्चितच यश आले आहे असे म्हणता येईल. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेचे अंधश्रद्धा निर्मूलन ही मानवी विकासातील, प्रगतीतील आणि आधुनिकीकरणासाठी अत्यावश्यक बाब आहे हे तर नक्कीच स्वीकारलेले आहे. म्हणजे अंधश्रद्धेचा प्रश्न आहे आणि त्याचे निराकरण केले पाहिजे याबद्दल सर्वसहमती झालेली आहे असे म्हणता येईल. त्या प्रश्नाच्या सोडवणुकीचा एक वस्तुपाठ गेल्या तीन दशकांच्या संघटित कामातून आम्ही उभा केला आहे. त्याबद्दल कदाचित मतभेद असू शकतात, पण त्यानिमित्ताने जगापुढे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यानुभव, त्याची वाटचाल, त्याचे सिंहावलोकन आणि त्याचे सामाजिक प्रभावाचे मूल्यमापन (Social Impact
Analysis) मांडायचा प्रयत्न महाराष्ट्र ‘अंनिस’ करणार आहे. तसाच प्रयत्न पुरोगामी-परिवर्तनवादींसह विचार धारेतील सर्व विचार प्रवाहांना प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्ष, संघटना, संस्था, गटांनी आणि व्यक्तींनीदेखील करावा असे जाहीर आवाहन आम्ही करीत आहोत. कारण समाज परिवर्तनासाठी काम करणाऱ्या कुठल्याही समूहाचे भवितव्य ती काळाच्या कसोटीवर किती समाजोपयोगी ठरते यावरच अवलंबून असे आम्हाला वाटते. त्यानुसार आपणच आपली उपयोगिता महाराष्ट्र राज्य महोत्सवी वर्षानिमित्त जनतेसमोर स्वतःहून मांडावी असे ‘अंनिस’चे मत आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र अंनिसच्या त्रिदशकपूर्ती वर्षानिमित्ताने आम्ही आमच्या संघटित कामाचा लेखाजोखा मांडायचा प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी विशेषांक निर्मिती व प्रकाशनाची तयारी सुरू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून आमच्या कामाबद्दल त्यांचे निरीक्षण, मूल्यमापनदेखील जाणून घेण्यात आम्हाला रस आहे. त्यासाठीचे वेगळे नियोजनबद्ध प्रयत्न केले जाणार आहेत. अशा मराठी व इंग्रजीतील विशेषांकाचे प्रकाशन ऑगस्ट 2019 मधे मुंबईत होणाऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत व दोनदिवसीय संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात केले जाणार आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट 2019 ते 1 मे 2020 म्हणजे महाराष्ट्र राज्य साठाव्या वर्धापन दिनापर्यंतच्या कालावधीत आम्ही संघटनेतर्फे विविधांगी पद्धतीने व मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कार्याचे योगदान जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे अभियान राबविणार आहोत. या सर्व संकल्पसिद्धीसाठी महाराष्ट्राच्या सुजाण जनतेने यथाशक्ती सहकार्य करावे.

(लेखक हे महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या