‘महाराष्ट्र बंद’चा विद्यार्थ्यांना फटका

सामना ऑनलाईन । मुंबई

भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या हिंसक घटनेचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा फटका विद्यार्थ्यांना बसला. मुंबई विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांच्या आज (बुधवारी) परीक्षा होत्या. मात्र आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील वाहतूक तसेच रेल्वे वाहतूक वारंवार रोखून धरल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. या पार्श्वभूमीवर वेळेत न पोहचलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेणार असल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे. जे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा पोहचले, त्यांना एक तास वाढवून देण्यात आला होता.

महाराष्ट्र बंदच्या तीव्र पडसादांमुळे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने एक परिपत्रक काढले आहे. आंदोलनामुळे जे विद्यार्थी वेळेवर पोहचू शकत नाहीत त्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल असे परिपत्रकात नमूद केले आहे. या परिपत्रकामुळे बीए, एमएड, एम.ए, बी.कॉम, एम.कॉम, बीएससी, एम.सीए, एल.एल.बी च्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या