CoronaVirus चा कहर; महाराष्ट्रा पाठोपाठ या राज्यातही नाइट कर्फ्यूवर विचार, मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona

महाराष्ट्रात कोरोना संकट गडद झाले असतानाच आता अन्य राज्यांमध्ये देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. कोविड-19 या टप्प्यात अत्यंत वेगानं वाढत असल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाचे 16,620 नवीन रुग्ण आढळले आहेत. नव्यावर्षात एका दिवसात एवढे रुग्ण आढळण्याचा हा विक्रमी आकडा आहे. सोबतच राज्यामध्ये संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 23 लाख 14 हजारच्या पार पोहोचली आहे. गेल्या 24 तासात कोरोना संक्रमणामुळे 50 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये नाइट कर्फ्यू सुरू आहे. तर बऱ्याच भागात शनिवार – रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. आता महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशात देखील नाइट कर्फ्यूवर विचार सुरू झाला आहे.

हिंदी वृत्तवाहिनी आजतकने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या 24 तासात मध्य प्रदेशात 743 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मध्य प्रदेशात आता संक्रमितांची संख्या 2,68,594 वर पोहोचली आहे. प्रदेशात गेल्या 24 तासात या रुग्णांपैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात मरणाऱ्यांची संख्या 3,887 झाली आहे.

मध्य प्रदेशात आरोग्य विभागानुसार रविवारी कोविड-19 चे इंदूर मधून 263 नवीन रुग्ण समोर आले आहेत. भोपाळ मधून 139 आणि जबलपूर मधून 45 नवे रुग्ण समोर आले आहेत. मध्य प्रदेशात 2,68,594 संक्रमित रुग्ण आहेत तर या पैकी 2,59,987 रुग्ण बरे होऊन घरी परतले आणि 4,740 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मध्य प्रदेशात रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्याने राज्य सरकार जागं झालं आहे. कोरोनास्थिती संदर्भात पत्रकारांसोबत बोलताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, ‘संबंधित टीमला रात्रीचा कर्फ्यू आणि अन्य गोष्टींवर चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित विभागासोबत मंगळवारी एक बैठक होणार आहे आणि आवश्यक असल्यास योग्य ती पावले उचलली जातील.’