
राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढत असल्याने पुन्हा धोक्याची घंटा वाजू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील ताज्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड व भंडारा जिह्यात कोरोनाचा सर्वाधिक मृत्युदर आहे तर राज्यातल्या 21 जिल्हय़ांतील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा कडक निर्बंध घालण्याची वेळ येईल, अशी भीती आरोग्य खात्यातील अधिकारी व्यक्त करीत आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने आज कोरोनाविषयक आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे स्पष्टपणे दिसते. 3 फेब्रुवारीपासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात रुग्णांची संख्या 16 हजार 921 होती पण 10 ते 15 फेब्रुवारी या काळात रुग्णांची संख्या 21 हजार 486वर गेली.
रायगड, सिंधुदुर्ग, बीड, रत्नागिरी व भंडारा जिह्यात सर्वाधिक मृत्युदर
- जिल्हा – साप्ताहिक मृत्युदर
- 8 ते 14 फेब्रुवारी 21
- रायगड – 7. 46 टक्के
- सिंधुदुर्ग – 7.15 टक्के
- बीड – 6.21 टक्के
- रत्नागिरी – 6.09 टक्के
- भंडारा – 4.69 टक्के
या पाच जिह्यांत रुग्णवाढीचा दर सर्वाधिक
- जिल्हा – रुग्णवाढीचा दर
- 8 ते 14 फेब्रुवारी 21
- अमरावती – 10.69 टक्के
- वर्धा – 4.62 टक्के
- अकोला – 4.27 टक्के
- यवतमाळ – 3.16टक्के
- बुलढाणा – 2.28 टक्के
घट झाली पण पुन्हा रुग्ण वाढले
4 जानेवारीला राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 48 हजार पण 15 फेब्रुवारीला सक्रिया रुग्णांची संख्या घटून 36 हजार 201वर आली. मात्र फेब्रुवारीत पुन्हा रुग्ण वाढले.
राज्यातील रुग्णसंख्येचा चढता आलेख
- तारीख – रुग्णसंख्या
- 9 फेब्रुवारी – 34 हजार 640
- 15 फेब्रुवारी – 36 हजार 201
अमरावती, अकोला, नाशिक, वर्धा व बुलढाण्यात गेल्या आठवडय़ात सर्वाधिक पॉझिटिव्हीटी दिसून आली आहे.
राज्यातील नवीन रुग्ण व मृत्युदर
- आठवडा रुग्ण दैनंदिन नवीन रुग्ण मृत्यू
- 27 जाने. ते 2 फेब्रु. 16,921 2,418 277
- 3 ते 9 फेब्रु. 18,528 2,446 221
- 10 ते 15 फेब्रु. 21,468 3,581 192






























































