#MaharashtraCrisis सर्वोच्च न्यायालयात काय घडलं? वाचा सविस्तर मुद्दे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रीच्या अंधारात राष्ट्रवादीचे अजित पवार यांना हाताशी धरून गुपचूप शपथविधी उरकला. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. याआधी रविवारी न्यायालयाने सोमवार सकाळपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करा, असे आदेश भाजपला दिले होते. सोमवारी यावर पुन्हा सुनावणी झाली. अद्याप न्यायालयाने अंतिम निर्णय दिलेला नाही. उद्या मंगळवारी 10.30 वाजता न्यायालय आदेश देणार आहे. परंतु आज सोमवारी न्यायालयात काय घडामोडी घडल्या पाहूया…

युतीची राज्यपालांना कल्पना

निवडणुकीपूर्वी युतीची कल्पना राज्यपालांना होती. त्यामुळेच त्यांनी ९ नोव्हेंबरपर्यंत वाट बघितली. त्याचबरोबर 3 पक्षांनाही सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिले होते. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली, असे सरकारच्या वतीने बाजू मांडतांना तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं.

अजितदादांचे समर्थनाचे पत्र

राष्ट्रवादीचे तत्कालीन गटनेते अजित पवार यांनी भाजपाला दिलेल्या समर्थनाचे पत्र तुषार मेहता यांनी न्यायालयात सादर केले. अजित पवारांनी 54 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले होते. राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात यावी आणि स्थिर सरकार यावे, यासाठी आपण भाजपाला पाठिंबा देत असल्याचं पवारांनी या पत्रात म्हटल्याचे तुषार मेहता यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे पत्रही सादर

अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेले पत्रही न्यायालयासमोर सादर करण्यात आले. माझ्यासोबत 170 आमदारांचा पाठिंबा असून, अपक्षही आमदार सोबत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे.

कुटुंबातील वादाशी देणंघेणं नाही

भाजपाची बाजू मांडतांना मुकूल रोहतगी यांनी 54 आमदारांचा आम्हाला पाठिंबा असून, एक पवार आमच्या सोबत आहेत. तर दुसरे आमच्या विरोधात आहेत. त्यांच्या कुटुंबातील वादाशी आम्हाला देणंघेणं नाही. राज्यपालांनी पत्रांच्या आधारे निर्णय घेतला आहे, असे न्यायालयाला सांगितलं.

न्यायालयाचा सवाल

ज्या आमदारांनी पाठिंबा दिला, त्यांची स्थिती काय. त्यांनी पाठिंबा मागे घेतला आहे का?, असा प्रश्न न्यायालयाने रोहतगी यांना विचारला. त्यावर सध्या आम्हाला निश्चित सांगता येणार नाही. त्यांच्यात अंतर्गत वाद आहेत. मात्र, बहुमत चाचणीत हे दिसेल, असे रोहतगी म्हणाले. तसेच अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाने मागील काही काळात दिलेल्या निर्णयात 24 तासांत बहुमत चाचणी घेण्यात आली आहे. तर काही प्रकरणांमध्ये 48 तासांचा वेळ देण्यात आला होता, असेही खन्ना म्हणाले.

घाई का केली? – सिब्बल

शिवसेनेकडून बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी राज्यपालांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. शपथविधी होण्याच्या पूर्वसंध्येला तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर अशी कोणती राष्ट्रीय आपत्ती आली होती की, सकाळी शपथविधी करण्यात आला. 9 नोव्हेंबरपर्यंत शिस्तीत काम करणाऱ्या राज्यपालांनी अचानक एका रात्रीत घाई का केली?, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला

पत्राचा चुकीचा वापर – सिंघवी

राष्ट्रवादीकडून बाजू मांडताना अभिषेक मनू सिंघवी यांनी आमदारांचे पत्र चुकीच्या हेतूनं वापरण्यात आले असून राज्यपालांची फसवणूक करण्यात आल्याचे म्हटले. ते पत्र वेगळ्या कारणासाठी तयार करण्यात आले होते. मात्र, ते दुसरीकडं जोडण्यात आले, असेही त्यांनी न्यायालयात सांगितले. तसेच आम्ही सभागृहात पराभूत व्हायला तयार आहोत. पण, तरीही ते (भाजपा) बहुमत चाचणी घ्यायला तयार नाही, असे सिंघवी म्हणाले.

उद्या देणार निकाल

दोन्ही बाजूंनी युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून, यावर मंगळवारी सकाळी 10.30 सुनावणी होणार आहे.