
कल्याण-डोंबिवली मधील एका 33 वर्षाच्या तरुणाला कोविड19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची बाधा झाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. केपटाऊन-दुबई ते नवी दिल्ली ते मुंबई असा प्रवास करत हा तरुण आला होता. सौम्य ताप आणि खोकला अशी लक्षणं दिसल्यावर त्याची कोविड चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला. जनुकीय तपासणी केली असता त्यास ओमायक्रॉन व्हेरियंटची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या वर कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
त्यांच्या हाय रिस्क कॉंटैक्टमधील बारा तर लो रिस्क कॉंटैक्टमधील 23 लोकांचे स्वॅब चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक डिसेंबर पासून 3837 नागरिकांचे स्वॅब घेतले आहेत. त्यापैकी सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचे अहवाल जनुकीय तपासणी साठी देण्यात आले आहेत. मागील महिन्यातही अठ्ठावीस आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे अहवाल जनुकीय चाचणीसाठी देण्यात आले आहेत, असे टोपे यांनी सांगितले.
ओमायक्रॉन बाबत दक्षिण आफ्रिकेतून माहिती घेतली जात आहे. रुग्णांवर किती परिणाम होतो, उपचार आणि इतर बाबींची माहिती घेतली जात आहे. पूर्ण माहिती मिळाल्यावर आयसीएमआर त्याबाबत प्रोटोकॉल निश्चित करेल. त्यानंतरच त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ज्यांनी कोविड लस घेतली नाही, त्यांनी पहिली लस घ्यावी. पहिली घेतली असेल तर दुसरी मात्रा द्यावी, असे आवाहन टोपे यांनी केले.
परदेशातून आलेल्या नागरिकांनी आपली चाचणी करून घ्यावी. काही लक्षणे आढळल्यास तत्काळ संबंधित शासकीय दवाखान्यात संपर्क साधावा. कोविड अनुरुप वर्तणूक ठेवावी, मास्क वापरावा, हात वेळोवेळी धुवावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.




























































