अकरावीत मनमानी प्रवेशाला मोकळे रान, इनहाऊस, अल्पसंख्याक कोटय़ातील प्रवेश ऑफलाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुणवत्ता डावलून अकरावीत मनमानी प्रवेशाला मोकळे रान मिळाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले असून इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोटय़ातील प्रवेश कॉलेज स्तरावर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या परिपत्रकामुळे अकरावी प्रवेशात मोठय़ा प्रमाणात वशिलेबाजी होणार असून गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून मुकावे लागण्याची चिन्हे आहेत.

इनहाऊस कोटय़ातून संस्थेच्या शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांना 10 टक्के प्रवेश मिळतात, व्यवस्थापन कोटय़ातील 5 टक्के आणि अल्पसंख्याक शाळांमधील आणि अल्पसंख्याक कोटय़ामध्ये 50 टक्के अशा एकूण 65 टक्के जागा अकरावी प्रवेशात राखीव असतात. या जागा मागील वर्षांपर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरल्या जात होत्या. मात्र शिक्षण संचालनालयाने काढलेल्या नवीन परिपत्रकामुळे या सर्व जागा कॉलेज स्तरावर मनमानीपणे भरल्या जाणार आहेत.

याचा सर्वात मोठा फटका मुंबई, पुणे येथील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना बसणार आहे.

n इनहाउस कोटय़ातील प्रवेश हे ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीच्या आधी किंवा ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करायचे आहेत.
n व्यवस्थापन कोटय़ातील रिक्त जागा ऑनलाइन प्रवेशाच्या कोणत्याही टप्प्यावर सरेंडर करता येतील.
n ऑनलाइन प्रवेशाच्या तीन फेरीपर्यंत अल्पसंख्याक कॉलेजना जागा भरण्यासाठी अडचणी आल्यास त्यांना इतर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासोबतच रिक्त असलेल्या जागा तिसऱया फेरीपर्यंत राखून ठेवता येणार आहेत.

मुंबई विभागातील कोटय़ातील जागा

इनहाऊस – 14,148
अल्पसंख्याक – 87,811
व्यवस्थापन – 15,925
(आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एचव्हीसी मिळून)