
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई रविवारी मुंबईत आले असताना त्यांच्या स्वागतासाठी शिष्टाचाराप्रमाणे कुणीही वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित नव्हता. त्याबद्दल गवई यांनी नाराजी व्यक्त केली होती. आज राजकीय वर्तुळातूनही त्यावरून प्रतिक्रिया उमटल्या. भूषण गवई आंबेडकरी विचारांचे असल्याने त्यांचा अवमान केला का, असा सवाल केला जात आहे.
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई आज देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत. त्यांचे स्वागत प्रोटोकॉलनुसार व्हायला हवे होते, पण तसे झाले नाही. त्यांना भाडय़ाची गाडी दिली जाते. हे केवळ दुर्लक्ष नसून, त्यांच्या ‘संविधान सर्वोच्च आहे’ या स्पष्ट विचारामुळे सरकारने ही वागणूक दिली काय?’’ असा थेट आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने अख्ख्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. पण राज्यातील महायुती सरकार व अधिकाऱ्यांनी त्यांचा अवमान केला. गवई हे आंबेडकरी आहेत म्हणून त्यांचा महाराष्ट्रात अवमान केला आहे का? का मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले होते, असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला.
- ‘राजशिष्टाचारातील या त्रुटी आणि गवई यांचा अवमान महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभत नाही,’ असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले तर ही संकुचित मनोवृत्ती आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. मराठी मातीचा, मराठी अभिमानाचा गौरव महाराष्ट्राचे प्रशासन नाही करणार तर कोण करणार? आणि हो जाता जात नाही त्याला जात म्हणतात,’ असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.