शिंदे गटाचे आमदार अशोक पाटील यांच्या हर्णे येथील बांधकामावर कारवाईचे आदेश, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्या तक्रारीनंतर शासनाची दखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यातील हर्णे येथील कथित सीआरझेड उल्लंघन प्रकरणात शासनाने संबंधित बांधकामाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्णे येथील सर्वे क्रमांक १८ मधील जागेवर शिंदे गटाचे भांडुप येथील आमदार अशोक पाटील यांनी केलेल्या बांधकामाबाबत सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच विनाशेती परवानगी रद्द झाल्यानंतरही बांधकाम सुरू असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या स्तरावरून चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित बांधकाम सीआरझेड क्षेत्रात येत असल्याचे निष्पन्न झाल्यास नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, आमदार अशोक पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संबंधित जागा अ-कृषीक असल्याचे सांगितले. तसेच त्या ठिकाणी वॉटर पार्क असून ते कायमस्वरूपी बांधकाम नसल्याने सीआरझेडचे नियम लागू होत नसल्याचा दावा त्यांनी केला. हा विषय न्यायप्रविष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र प्राप्त झाल्याची माहिती दिली. संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी करून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.