
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करीत आहे. मात्र, विरोधकांकडून दर तीन महिन्यांनी सरकार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. सरकारला सत्तेत सव्वा वर्ष उलटून गेले आहे. त्यामुळे आमचे सरकार पाच वर्षे टिकणार,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित मुद्देमाल पुनःप्रदान व अनुपंपा भरती पोलीस पाल्य नियुक्तिपत्र कार्यक्रमानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.
पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारला सव्वा वर्ष पूर्ण झाले आहे. तरीही विरोधक अजूनही दर तीन महिन्यांनी सरकार कोसळणार असल्याचे म्हणतात. प्रत्यक्षात आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे.’ दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यायला सरकार घाबरत असल्याचे म्हटले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना, ‘पाटील यांच्या वक्तव्यात तथ्य नसून सर्वकाही खोटे आहे,’ असे पवार म्हणाले.






























































