अर्ध्या महाराष्ट्रावर ‘गुलाबी’ पावसाचे ढग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे अर्ध्या महाराष्ट्रावर पावसाचे ढग दाटले आहेत. पुढील दोन-तीन दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी विदर्भ आणि मराठवाडय़ात तर मंगळवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सोसाटय़ाच्या वाऱयांसह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

पावसाचे ढग आणि सोसाटय़ाचा वारा सोबत घेऊन ‘गुलाब’ चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. वाऱयाचा वेग भयानक असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पुलाबा वेधशाळेच्या हवामान तज्ञ डॉ. शुभांगी भुते यांनी केले आहे.

मुंबईत या वादळाच्या प्रभावाने सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, साताऱयात मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. पुण्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पालघर, ठाणे, रायगड जिह्यात मंगळवारी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

मराठवाडय़ात हाहाकार, शेतकरी हवालदील

मराठवाडय़ात गेल्या सहा दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणे भरून वाहू लागली आहेत. पावसामुळे कापूस, सोयाबीनसह अन्य पीके मात्र जमीनदोस्त झाली असून शेतकरी ओला दुष्कार जाहीर करण्याची मागणी करत आहेत. जिह्यात लहानमोठय़ा धरणांचे दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. महापूराच्या भीतीने धरणाजवळील आणि नदीकाठावरील गावांना सतर्पतेचा इशारा देण्यात आला आहे.

लातूर, धाराशीव, जालना, संभाजीनगरात जनजीवन विस्कळीत

लातूर, धाराशीव, जालना, संभाजीनगर जिह्यांत बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ, सेनगाव, वसमत, कळमनुरी त्याचप्रमाणे परभणी आणि जिंतूर तालुक्यात नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाने शेतकऱयांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. उभी पीके जमीनदोस्त झाली आहेत.

बीडमध्ये 37 गावांचा संपर्क तुटला, नांदेडमध्येही मुसळधार

धुवाधार पावसाने बीडची दैना केली आहे. 37 गावांचा संपर्क तुटला आहे. वडवणी, शिरूर तालुक्यात तर ढगफुटी झाली आहे. मनकर्णिका, बिंदुसरा, कुडलिका, सरस्वती, सिंदफणा आदी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेवराईच्या अमृता नदीला आलेल्या महापुरात सुदर्शन संत हा तरुण वाहून गेला.