
विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारवर जोरदार हल्ला केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करूनही कर्नाटक सरकारच्या कुरापती सुरूच आहेत, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करून लोकशाही मूल्ये पायदळी तुडविण्याचे काम कर्नाटकने केले आहे, असा आरोप त्यांनी केला. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. कर्नाटकची मुजोरी अशीच सुरू राहिली तर मुहतोड जवाब द्या, असेही ते म्हणाले.
बेळगावात येण्याची परवानगी खासदार धैर्यशील माने यांनी तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती;
परंतु कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून त्यांना बेळगावात बंदी केली गेली. महाराष्ट्रातील कोणत्याच नेत्याने तेथे जाऊ नये म्हणून बेळगावच्या हद्दीतील कोगनोळीसह 21 सीमानाक्यांवर हजारो पोलीस तैनात केल्याची माहिती या वेळी अजित पवार यांनी दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सीमाप्रश्नावर ठराव मांडून तो सर्व पक्षांनी मंजूर करण्याची सूचना यानिमित्ताने केली.
बोम्मईंशी मी बोलतो –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आमची बैठक झाली. त्यात अॅक्शनला रिअॅक्शन येऊ शकते असे आम्ही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सीमाप्रश्नावर सभागृहात ठराव मांडण्यात येईल. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याशी आपण बोलणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

































































