आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा; औषधांचा तुटवडा, पुरेसे कर्मचारीही नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर शिव आरोग्य सेनेने शनिवारी पूर्व उपनगरातील विविध रुग्णालयांना भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची पोलखोल केली. औषधांची कमतरता, पुरेसे डॉक्टर आणि कर्मचारी नाहीत अशी रुग्णालयांतील विदारक स्थिती यानिमित्ताने समोर आली.

शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर व महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या सूचनेनुसार आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱयांनी शनिवारी घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालय, घाटकोपर पश्चिम येथील संत मुक्ताबाई रुग्णालय, मानखुर्द येथील शताब्दी रुग्णालय आणि देवनार महानगरपालिका प्रसूतिगृह या रुग्णालयांवर धडक देऊन तेथील आरोग्य यंत्रणेची पाहणी केली. राजावाडी रुग्णालयात अपुरा स्टाफ असल्याचे दिसले. शताब्दी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी रुग्णांना अडचणी येत असल्याचे तसेच येथे नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टरांची कमतरता असल्याचे पाहायला मिळाले. शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱयांनी संत मुक्ताबाई रुग्णालयातील डॉ. कदम व डॉ. नायर यांची भेट घेऊन त्यांच्याकडून रुग्णालयातील औषध पुरवठय़ाची, कर्मचारी वर्गाची माहिती घेतली. पुरेशी औषधे आणि कर्मचारी नाहीत, असे त्यांनी सांगितले. नर्सिंग स्टाफ, प्लंबर, लिफ्टमन, एसी मेकॅनिक नाहीत. सदर स्टाफ कंत्राटी तत्त्वावर मिळाले तरी चालेल. तसेच नेत्र चिकित्सक तसेच डिजिटल एक्स-रे मशीनची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

देवनार प्रसूतिगृहात सुविधांची वानवा

देवनार प्रसूतिगृहातदेखील मुबलक औषधे, डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफची कमतरता आहे. त्यामुळे प्रसूतीसाठी रुग्णांना राजावाडी किंवा शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात येते, असे आढळले. शिव आरोग्य सेनेचे मुंबई पूर्व उपनगर सहसमन्वयक प्रकाश वाणी, शिवाजीनगर विधानसभा समन्वयक डॉ. आनंद बाबर, घाटकोपर पश्चिम विधानसभा सह समन्वयक जयेश पवार, घाटकोपर आरोग्य संघटक सचिन भांगे, उपशाखाप्रमुख संतोष रुके आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

वांद्रे येथील भाभा रुग्णालयावर शिवसैनिकांची धडक

तुमच्या भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये जाऊन तेथील परिस्थिती जाणून घ्या, औषधे व अन्य आवश्यक साधनांचा पुरवठा व्यवस्थित होतो का याबाबत माहिती घ्या, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसैनिकांना केले होते. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिवसेना- युवासेना वांद्रे पश्चिम विधानसभेतील शिवसैनिकांनी आज वांद्रे पश्चिम येथील भाभा रुग्णालयात धडक देत तेथील आरोग्य यंत्रणेची पाहणी केली.

भाभा रुग्णालयातील पाहणीदरम्यान शिवसैनिकांनी रुग्ण व रुग्णालय व्यवस्थापन यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली. याप्रसंगी वांद्रे पश्चिम विधानसभा संघटक शीतल शेलार, उपविभागप्रमुख सुदेश डुबे, चिंतामणी निवाते, जितेंद्र जानावळे, शाखाप्रमुख संदीप मेटकर, प्रफुल घरत, गुरुदेव झेंडे, सुनील जाधव, पांडुरंग वाघे, युवासेना अधिकारी गौरव मोरे, ममता चव्हाण, मनीषा फोंडे, शाखा संघटक अलका मंडलिक, प्रियांका सावंत, साधना वरस्कर, श्रद्धा मोरे, उपविभाग अधिकारी दत्ताराम हुंबे, शाखाधिकारी चिन्मय ठाकूर, सिद्धेश सावंत, शाखा समन्वयक विकी खांबे, विशाल वाजंत्री, दुर्गेश मंडलिक आदी उपस्थित होते.

शिवडी आरोग्य केंद्रातील समस्या दूर करण्यासाठी पाठपुरावा करणार

शिवसेना शाखा प्रभाग क्र. 206 शिवडी-कॉटन ग्रीनमधील रहिवासी मुंबई महापालिकेच्या ज्या आरोग्य केंद्रातून आरोग्य सुविधा घेत असतात अशा रामटेकडी दवाखाना, शिवसेना नेते वामनराव महाडिक मार्ग येथील पॉली क्लिनिक, शिवडी-कोळीवाडा येथील आरोग्य दवाखाना, ए. डी. मार्ग शिवडी येथील दवाखाना, अभ्युदय नगर येथील दवाखाना या सर्व सरकारी आरोग्य केंद्रांची शिवसैनिकांनी शनिवारी पाहणी केली. डॉक्टरांशी तसेच रुग्णांशी संपर्क साधून त्यांच्या विविध समस्यांची माहिती माजी नगरसेवक सचिन पडवळ, शाखाप्रमुख हनुमंत (बैजू) हिंदोळे यांनी घेतली. सदर भेटीदरम्यान  निदर्शनास आलेल्या समस्यांबाबत लवकरच शिवसेनेच्या वतीने संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार करून या सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती सचिन पडवळ यांनी दिली.