
राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे नेते व दि महाराष्ट्र मंत्रालय को-ऑप. सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. आनंदराव अडसूळ व त्यांच्या साथीदारांचे नियमबाह्य काम करण्यास नकार दिल्यामुळे पठाण व त्यांच्या अन्य सहकाऱयांना लक्ष्य करण्यात आले. अडसूळ व त्यांच्या टोळीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत पठाण आणि त्यांच्या सहकाऱयांना मारहाण केली.
भाऊसाहेब पठाण हे मंगळवारी संस्थेच्या कार्यालयात असताना आनंदराव अडसूळ व त्यांचे सहकारी तेथे गेले. लक्ष्मीकांत जोगल आणि विठ्ठल या दोघा युनियनच्या सदस्यांची संस्थेच्या संचालकपदावर नेमणूक करावी व याच मीटिंगमध्ये करावी अशी मागणी अडसूळ व त्यांच्या सहकाऱयांनी केली, मात्र आता काही होणार नाही, सहा महिने थांबावे लागेल अशी विनंती पठाण यांनी केली. त्यानंतर संस्थेच्या कर्मचाऱयांकडून प्रत्येकी 45 रुपये वर्गणी जमा करून युनियनच्या नावाने धनादेश द्यावा अशी मागणी केली, परंतु ही बाब नियमानुसार नसल्याने तसे करता येणार नाही असे पठाण म्हणाले. त्यामुळे अडसूळ व त्यांच्या टोळीतील सहकाऱयांचा पारा चढला. त्यांनी पठाण तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन चव्हाण यांना शिवीगाळ करत मारहाण केली. याशिवाय संस्थेच्या कर्मचारी संगीता मोरे यांनादेखील दमदाटी केली. याप्रकरणी पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुह्याची नोंद केली आहे.
























































