
नवनाथ शिंदे
पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षातील महिला साहाय्य कक्षामुळे शहरातील विविध भागामधील महिलांच्या कौटुंबिक वादासह विविध तक्रारींचे निवारण करण्यात यश आले आहे. गतवर्षी महिला साहाय्य केंद्राकडे दाखल झालेल्या 2 हजार 896 तक्रारींपैकी 1 हजार 675 प्रकरणांमध्ये समेट घडविण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना नांदा सौख्य भरे याची अनुभूती येत आहे. त्याशिवाय यावर्षीही दाखल तक्रारींपैकी 55 प्रकरणांमध्ये मध्यस्थी केली आहे.
कौटुंबिक वादाचे निराकरण करण्यासाठी भरोसा सेलच्या महिला कक्षाकडून प्राधान्य देण्यात येते. कौटुंबिक हिंसाचार, घरगुती वादासह किरकोळ कारणांमुळे होणारे तंटे सोडविण्यासाठी दाम्पत्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांच्यातील वाद समुपदेशनाने सोडवून समेट घडविला जात आहे. मागील वर्षी महिला साह्य केंद्राकडे दाखल झालेल्या 2 हजार 896 तक्रारींपैकी तब्बल 1 हजार 675 प्रकरणांतील दुरावा कमी करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे तक्रारदार महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडून महिलांना कौटुंबिक वादापासून विविध अडचणींतून बाहेर काढण्यासाठी मध्यस्थी करण्यावर भर दिला जातो.
महिला साहाय्य कक्ष, विशेष बालक पथक, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रार निवारण केंद्राद्वारे कामाला गती दिली जाते. विशेषतः वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशन, कायदेविषयक माहिती देण्यात येते. त्यानंतर संबंधित दांपत्याला कक्षात बोलावून दोन्ही बाजू ऐकून समुपदेशन केले जाते. त्यामुळे बहुतांश प्रकरणात महिलांच्या संसाराची गाडी रूळावर आली आहे. किरकोळ वाद, सासु-सुनेचे भांडण, पतीचा अहंकारीपणा, आर्थिंक प्रश्नांमुळे घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय घेण्याची महिलांची मानसिकता बदलण्यासाठी भरोसा सेल स्तुत्य काम करीत आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम, एपीआय सुजाता शानमे यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशक
नातलगांची ढवळाढवळ ठरतेय कारणीभूत
शहरातील बहुतांश कौटुंबिक तक्रारींमध्ये सासू-सासरे, नातेवाईकांसह इतरांची ढवळाढवळ कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे अवघ्या एका महिन्यातच घटस्फोटापर्यंत तक्रारी दाखल होत आहेत. त्याशिवाय पती-पत्नीमधील किरकोळ वाद, सुसंवादाचा अभाव, एकमेकांना समजून न घेणे, लग्नानंतर वेळ न देणे अशारितीने महिलांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे मुलामुलींच्या लग्नानंतर त्यांच्या संसारात हस्तक्षेप करून काडीमोड करण्याऐवजी, त्यांना आधार देणे गरजेचे असल्याचे मत समुपदेशकांनी व्यक्त केले आहे.
दामिनी पथकांचीही दमदार कामगिरी
महाविद्यालय परिसर, शाळा, उद्याने परिसरात महिलांच्या छेडछाडीला आळा घालण्यासाठी दामिनी पथकांकडूनही दमदार कामगिरी केली जात आहे. महिला अमलदारांकडून त्वरित घटनास्थळी भेट देऊन टवाळखोरांविरूद्ध कारवाई करण्यावर भर दिला आहे. महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष क्रमांक (हेल्पलाइन क्रमांक- 1091) उपलब्ध करून दिला आहे.
महिला साहाय्य कक्षाकडे तक्रारींची आलेख
वर्ष एकूण अर्ज समझोता न्यायालयात
2019 3 हजार 99 2 हजार 37 311
2020 2 हजार 74 1 हजार 441 129
2021 2 हजार 896 1 हजार 675 233
2022 498 51 18
महिलांच्या प्राप्त तक्रारीनुसार संबंधित दोन्ही कुटुंबीयांना बोलावून त्यांचे समुपदेशन केले जाते. विशेषतः सासू-सासरे, दाम्पत्य, इतर नातेवाईकांना बोलावून समजूत घालण्यावर भर दिला जातो. त्यामुळे तक्रारींमध्ये समझोता होण्यास मदत होत आहे. नवदाम्पत्याच्या संसारात इतरांची ढवळाढवळ तक्रारीस कारणीभूत असल्याचे दिसून येते. मात्र, सुसंवादानंतर अनेकांचे संसार फुलले आहेत.
– सुजाता शानमे, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल

























































