राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांचा-महापुरुषांचा अवमान केल्यास आजीवन कारावास; पाच लाखांपर्यंतचा दंड, विधानसभेत विधेयक सादर

अलीकडच्या काळात विविध समाजमाध्यमांद्वारे धर्मगुरू, ऐतिहासिक महापुरुष आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांच्या विरोधात अपमानकारक, आक्षेपार्ह  विधान करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारांना रोखण्यासाठी धर्मगुरू, ऐतिहासिक महापुरुष आणि राष्ट्रीय अपमान (प्रतिबंध आणि शिक्षा) हे अशासकीय विधेयक विधानसभेत सादर झाले आहे. यामध्ये आजीवन कारावासापर्यंत वाढवता येऊ शकेल अशी शिक्षा करण्याची तरतूद यामध्ये आहे.

महाराष्ट्र हे विविध समाज, संस्पृती, धार्मिक श्रद्धा असलेले राज्य आहे. मागील काही वर्षांपासून आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे धार्मिक आणि ऐतिहासिक तणाव निर्माण होऊन शांततेला बाधा आली आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक नेत्यांचे पावित्र्यतेचे रक्षण करणे सामाजिक सलोख टिकवणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे आमदार रईस शेख यांनी हे अशासकीय विधेयक सादर केले. अशी कृत्ये तसेच गुन्हे करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होऊन त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी हे विधेयक सादर झाले आहे.

शिक्षेची तरतूद कोणती…

पूज्य नेते आणि प्रतिष्ठत व्यक्तींची बदनामी करण्याचा जो कोणी कट रचतो किंवा करण्याचा प्रयत्न करतो, प्रोत्साहन देतो किंवा जाणूनबुजून मदत करतो अशा व्यक्तींना पाच वर्षांपेक्षा कमी नसलेली, परंतु आजीवन कारावासापर्यंत वाढवता येऊ शकते अशी कारावासाची शिक्षा आणि किमान पाच लाख रुपयांच्या दंडास पात्र असेल अशी तरतूद या विधेयकात आहे. हे अशासकीय विधेयक असल्याने ते मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. अशासकीय विधेयके अनेकदा मंजूर होत नाहीत. विधिमंडळाचे सदस्य त्यांना वाटणाऱ्या निकडीच्या विषयाशी संबंधित अशासकीय विधेयक सादर करतात.