
सामना प्रतिनिधी । बीड
बीड जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांची महाराष्ट्र राज्य जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी सोमवारी निवड करण्यात आली. संभाजीनगर येथे आयोजित जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची निवड करण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे संभाजीनगर येथे आयोजन करण्यात आले होते. या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदी डॉ. राजीव कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नितीन अंबाआडेकर, डॉ. स्वप्नील लाळे आदी उपस्थित होते. या बैठकीत बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांची महाराष्ट्र राज्य जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
डॉ. पवार हे बीड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी नंदूरबार येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम केले आहे. हे काम करत असताना नंदूरबार जिल्ह्यातील आदीवासी भागामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कार्य केले आहे. अनेक योजना थेट आदीवासी भागातील पाड्यामध्ये पोहोचविण्यात यश मिळविले आहे. बीडमध्ये सुद्धा अत्यंत शिस्त आणि नियोजनबद्ध काम करून आरोग्य सेवेचा दर्जा उंचावला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.





























































