वर्षभरात रस्ते अपघातात 14 हजार 883 जणांचा बळी, 28 हजारहून अधिक जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच अपघातांचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. गेल्या वर्षभरात राज्य मार्गाबरोबरच राष्ट्रीय महामार्गावर 33 हजार 69 अपघात झाले असून त्यात 14 हजार 883 जणांचा बळी गेला आहे, तर 28 हजार 628 जण गंभीर जखमी झाले होते. कोरोना महामारीच्या आधीची अकडेवारी पाहता अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रात सध्या 4 कोटी 33 लाख वाहनांची संख्या असून त्यात वर्षाला लाखो वाहनांची भर पडत आहे. मात्र राज्यातील रस्त्यांची लांबी सुमारे 3 लाख 25 हजार किलोमीटरची आहे. त्यामुळे दर किलोमीटरला 134 एवढी मोठी वाहनांची संख्या आहे. अनेक वाहनधारक बेफाम वाहने चालवत असल्याने अपघातांची संख्या वाढली असून त्यात बळी जाणाऱयांचे प्रमाणही वाढत आहे.

कोरोना महामारीच्या आधी म्हणजे 2019 मध्ये 32 हजार 925 अपघात झाले होते. त्यात 12 हजार 788 जणांचे बळी गेले होते. त्याचा विचार करता 2022 मध्ये 33 हजार 69 अपघातांमध्ये 14 हजार 883 जणांचा मृत्यू झाला होता. यावरून अपघातांच्या संख्येबरोबरच त्यात मृत्यू होणाऱयांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. दरम्यान वाढते अपघात रोखण्याचे मोठे आव्हान राज्याच्या परिवहन विभागासमोर आहे.