
आदिवासी विकास महामंडळाकडे रखडलेले २२ कोटी रुपये शहापूर तालुक्यातील सुमारे पाच हजार शेतकऱ्यांना आठवडाभरात मिळणार आहेत. आदिवासी विकास महामंडळाने भाताची खरेदी केल्यानंतर या शेतकऱ्यांना पैसे देण्यात टाळाटाळ सुरू केली होती. भिवंडीचे खासदार बाल्यामामा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यावर्षी फेब्रुवारी व मार्च या महिन्यात तालुक्यातील पाच हजार ७१ शेतकऱ्यांकडून २२ कोटी ४९ लाख ३० हजार किमतीचा तब्बल १४ हजार १५७ क्विंटल भात खरेदी करण्यात आला होता. या शेतकऱ्यांना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला भात खरेदीची रक्कम मिळणे अपेक्षित होते. यापैकी अवघ्या २१ शेतकऱ्यांच्या खात्यावर एक हजार क्विंटल भाताचे २३ लाख ६१ हजार रुपये जमा झाले आहेत. उर्वरित पाच हजार ४२ शेतकऱ्यांचे १३ हजार १४७ क्विंटल भाताचे सुमारे २२ कोटी २५ लाख ६१ हजार रुपये दीड महिना उलटून गेल्यानंतरही रखडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होता.



























































