‘त्या’ गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही; राज्यातील समस्यांबाबत अंबादास दानवे यांचा राज्य सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरुन सरकारवर टीकास्र डागले आहे. शिवसेनेच्या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा प्रश्नावर ते म्हणाले, अशा गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही. आम्ही विरोधी पक्ष आहोत. सरकारच्या चुकांवर बोट ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. सरकारला यात गैर वाटत असेल आणि त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील, तर शिवसेना या गुन्ह्यांची चिंता करत नाही. असे गुन्हे आमच्यावर अनेकदा दाखल झाले आहेत, असे दानवे यांनी सांगितले.

मुंबईतील आझाद मैदानावर विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. या शिक्षकांबाबतच्या धोरणाला सरकार तिलांजली देत आहे. 10 ऑक्टोबरपासून शिक्षक आंदोलन करत आहेत, मात्र त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही. या संदर्भात सरकार खोटी आश्वासने देत आहे, असा आरोपही दानवे यांनी केला आहे. या ठिकाणी अघोषित शिक्षकही आंदोलनाला बसले आहेत. शिक्षक म्हणून घोषित करावं, या त्यांच्या किमान मागणीकडेही सरकार दुर्लक्ष करत असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

पुराच्या पाण्यामुळे पाणी पुरवठा करणारे पंपच बंद आहेत, त्यामुळे आकाशातून पाणी टाकू का? असं विधान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्याचा समाचारही दानवे यांनी घेतला आहे. मंत्र्यांनी जनतेच्या भावनांकडे संवेदनशीलतेनं बघितलं पाहिजे. मंत्र्यांनी अशा पद्धतीचं बोलणं जनतेच्या भावनेचा अपमान आहे, असे दानवे म्हणाले आहेत.

राज्यातील शिधा वाटपाच्या पाकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. या सणात नेत्यांनी राजकारण करू नये. एखादी मोठी योजना राबवून दिवे लावल्यास त्याबाबत फोटोच काय अन्य बऱ्याच गोष्टी केल्या तरी आमचा आक्षेप नाही. जनतेच्या पैशातून 200 रुपयांचा फराळ ठेकेदाराला 303 रुपये देऊन सरकार परत जनतेलाच देतंय. यावर प्रदर्शन करण्याची गरज नाही, अशी टीका दानवे यांनी केली आहे. राज्यातील पोलिसांच्या बदल्या करण्याची गरज आहे. पण हे सरकार या बदल्या सुद्धा करत नाहीए. या बदल्या लवकर झाल्या पाहिजे ही विरोधी पक्षांची भूमिका आहे, असे दानवे म्हणाले.