
महावितरण आपले अपारंपरिक ऊर्जा वापराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्यातील 15 पवन ऊर्जानिर्मिती करणाऱया कंपन्यांकडून 157 मेगावॅट वीज खरेदी करणार आहे. त्याबाबतच्या वीज खरेदी कराराला वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. तसेच सदरच्या प्रकल्पातून महावितरणला प्रतियुनिट 2 रुपये 65 पैसे एवढय़ा कमी दराने मिळणार आहे.
औष्णिक वीज प्रकल्पातील विजेच्या तुलनेत सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पातील वीज कमी दरामध्ये उपलब्ध होत आहे. तसेच या विजेमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नसल्याने महावितरणने जास्तीत जास्त वीज अपारंपरिक वीज प्रकल्पातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पवन ऊर्जा कंपन्यांकडून वीज खरेदी करण्यासाठी महावितरणने टेंडर मागवले होते. त्यामध्ये 15 कंपन्यांना 2 रुपये 65 पैसे दराने वीज उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. त्याला मंजुरी मिळावी म्हणून महावितरणने 2021 मध्ये वीज आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे महावितरणला स्वस्तात वीज उपलब्ध होणार आहे.
































































