महावितरणचा भोंगळ कारभार, दोन बल्बसाठी 1 लाख 24 हजाराचे लाईट बिल!

निलंगा तालुक्यातील हालसी येथील एका सामान्य ग्राहकाला महावितरणच्या भोंगळ कारभाराचा मोठा फटका बसला आहे. मारुती रंगराव सावरे नामक ग्राहकाच्या घरात केवळ दोन बल्ब असताना, त्यांना एका महिन्याचे तब्बल 1 लाख 24 हजार इतके प्रचंड वीज बिल आले आहे. मीटर रीडिंग घेणाऱ्या लाईनमनच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप सावरे यांनी केला असून, या जाणीवपूर्वक त्रासाविरोधात वेळोवेळी तक्रार करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.

​मारुती सावरे हे एका किराणा दुकानात मुनीम म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्यासारख्या सामान्य व्यक्तीला महावितरणच्या चुकीमुळे आलेले 1 लाख 24 हजार रुपयांचे बिल भरणे कसे शक्य आहे, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. ​चुकीची रीडिंग घेऊन वाढीव बिल देण्याच्या या प्रकाराबाबत सावरे यांनी वारंवार महावितरणच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष करून संबंधित लाईनमन जाणीवपूर्वक ग्राहकाला त्रास देत असल्याचा आरोप सावरे यांनी केला आहे. यामुळे महावितरणच्या कार्यक्षमतेवर आणि ग्राहकसेवेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात आणि चुकीच्या बिलामुळे सामान्य ग्राहकास होणाऱ्या त्रासाविरोधात, वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालावे. संबंधित लाईनमनवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करावी आणि चुकीचे बिल त्वरित दुरुस्त करावे, अशी मागणी वाढीव बिल आलेल्या मारुती सावरे यांनी केली आहे. महावितरणने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन, तत्काळ बिलाची दुरुस्ती करावी आणि दोषी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.