‘महावेट नेट’ नव्या संगणकीय प्रणालीबाबत नगरमध्ये प्रशिक्षण

357

नगर जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने आता ऑनलाइन होणार आहेत. महावेट नेट या प्रकल्पांतर्गत हे दवाखाने जोडले जाणार असून या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालकांना दिल्या जाणार्‍या सेवा, सुविधा, दैनंदिन कामकाजाच्या सर्व नोंदी ऑनलाइन पद्धतीने नोंदविल्या जाणार आहेत. महावेट नेटच्या नगर जिल्ह्यातील अंमलबजावणीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या पुढाकारातून प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. महाराष्ट्रात प्रथमच नगर जिल्ह्यात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे.

कार्यशाळेत निवृत्त सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ.एस.बी.तटवर्ती, पुण्यातील प्रॅक्सेलो सोल्युशनचे मोहित भिशीकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.अजय थोरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुनिल तुंबारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ.तुंबारे यांनी सांगितले की, पशुवैद्यकांना सध्या शेतकर्‍यांच्या गोठ्यात जाऊन वैद्यकीय सेवा, सुविधा देण्याबरोबरच 19 प्रकारची नोंदणी पुस्तिका (रजिस्टर) हाताने लिहाव्या लागतात. दवाखान्यात आलेल्या जनावरांचे केसपेपरही तयार करावे लागतात. ही सर्व कामे आता ऑनलाइन होणार आहेत. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशुगणनेवेळी देण्यात आलेले टॅब आणि इंटरनेट जोडणी देण्यात येणार आहे.

नगर जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांचे कामकाज ऑनलाइन करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. ऑनलाईन नोंदणीमुळे बोगस आकडेवारी, खोट्या नोंदणी राहणार नाही. शेतकर्‍यांनाही ही माहिती सहज उपलब्ध होणार आहे. शिवाय पशुधनाला मिळालेल्या वैद्यकीय सेवा आणि सुविधांविषयी दर तीन महिन्याला मेसेजही प्राप्त होणार आहे. जन्मतः लसीकरण, शस्त्रक्रिया, कृत्रिम रेतन सुविधांची नोंद ऑनलाइन घेतली जाणार आहे. या माहितीच्या आधारे एका क्लिकवर पशुवैद्यकीय दवाखान्यातील कामकाज उपलब्ध होणार आहे. या कार्यशाळेत तज्ज्ञांनी महावेट नेट प्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 वरती काम करणारे सर्व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, पंचायत समिती आणि पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 वरती संलग्न पदावर काम करत असणारे सर्व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या