
>>महेंद्र पाटील
कुणाची तरी वाट पाहणं हा किती वेगळा अनुभव असतो! कधी हुरहुर, कधी ओढ, कधी सुख, कधी दुःख, कधी वेदना, काही प्रश्न, काही उत्तरं… खूप साऱया गोष्टी लपलेल्या असतात एखाद्या भेटीत. आपल्याला भेटायला येणारी व्यक्ती येताना खूप काही घेऊन येते. जाताना खूप काही देऊन जाते. आपण मनात भेटीची आस ठेवून टक लावून तिच्या वाट पाहत असतो. या वाटेवरून कधीकाळी काही प्रवास सुरू झालेले असतात. दुःख याच गोष्टीचं असतं की, ते प्रवास याच वाटेवर येऊन थांबतात किंवा संपतात म्हणून कधी कधी वाटतं, प्रत्येक भेटीचे निकष हे ठरलेले असावेत. दोन भेटीतलं अंतरही ठरलेलं असावं. कधीतरी एखाद्या निवांत संध्याकाळी दोघांची अनाहूतपणे भेट होते. जी आपल्या मनातही नसते. परंतु नियतीचे फासे पडत जातात अन् दोघं समोरासमोर येतात. आठवतं, गेल्या वैशाखात अशीच एक संध्याकाळ आली होती. तुझ्या माझ्या आयुष्यातली एक अविस्मरणीय सुखद क्षणांची संध्याकाळ मनातले सारे कप्पे उघडून भावनांना उलगडून गेली. काय नव्हतं त्या भेटीत? भेट असावी तर अशी! लाखात एक, मनाच्या आभाळात ध्रुव ताऱयासारखी लखलखणारी. तुझे माझे डोळे एकमेकांना भेटले. मनामनाची गुंफण, हातात हात, हृदयाचा चुकलेला ठोका, गिळलेला आवंढा, अंतरी माजलेले काहूर, श्वासाचा मंद आवेग, शब्दांची देवाणघेवाण, मनाचा कोपरान्कोपरा व्यापून टाकणारी तू, विसरलेलं भान, हरवलेलं मन, शब्दामागे शब्द आणि एखादी सुंदर कविता… तुझ्यासमोर बसून तुझ्यावरच केलेली.
तू एका सुन्या नदीचा
अजाणसा गं तीर,
तू अल्लड सखी गं,
वेडी जराशी अधीर,
तू भिरभिरणारा वारा,
तू लुकलुकणारा तारा,
तू शांत सावली झाडाची,
तू आसमंत हा सारा…
तू आसमंत हा सारा
तुझ्या डोळ्यात पूर्ण सांज उतरली होती. इतपं निरागस कुणी असू शकतं का? निरागसपणा वाटताना देवाने कदाचित तुला झुकतं माप दिलं असावं. तुझ्याकडे पाहताना तुझ्यातला थोडा निरागसपणा आपल्यासोबत घेऊन जावा असं त्या संध्येला नेहमी वाटत असावं. म्हणून आपल्या भेटीच्या वेळी ती हळूहळू जायची. त्या दिवशी ती असंच वागली. त्यामुळे तुला मला खूप वेळ मिळाला. एकमेकांशी भरभरून बोलल्यानंतर माझी घराकडे परतण्याची वेळ झाली तेव्हा वर्षा ऋतूत पुन्हा भेटू या असं आपण दोघांनीही ठरवलं आणि ती भेट तिथेच संपवली.
एका नव्या भेटीची आस पुन्हा मनात घेऊन जगायचं आणि पुन्हा वाट पाहायची येणाऱया ऋतूची असं दोघांच्याही मनानं ठरवलं. दिवस हळूहळू मागे पडू लागले तशी उत्पंठा वाढत गेली आणि वेळ मिळेल तसा आपल्या भेटीचे क्षण आठवत मी जगू लागलो. आता इथून पुढे सारं काही सरळ आणि सोपं वाटत असतानाच नियती पुन्हा हळूहळू आपले रंग दाखवायला सज्ज झाली. वैशाखानंतर ग्रीष्म तिच्या मदतीला धावून आला. आपल्या मनात पल्लवित झालेल्या आशा उमललेला ताटवा एका क्षणात होरपळून जावा इतपं वाईट वागली. नियती आपल्याशी खेळ खेळत होती. तुझ्या माझ्या वाटेवर एक असं वळण आलं, ज्यामुळे या वाटेवर एकत्र चालण्याचं आपलं स्वप्न पार धुळीला मिळालं. वादळ यावं तसं सगळं उद्ध्वस्त झालं. या वाटेवरून दूरवर चालत जायचं आपलं स्वप्न, डोळ्यांमधला निर्धार, सारं काही एका क्षणात नष्ट झालं. कारण या वळणावर तुझ्या सोबत तुझी इच्छा नसतानादेखील एक नवा सहप्रवासी तुझ्यासोबत जोडला गेला आणि आपल्या वाटा वेगळ्या झाल्या. तू चालत गेलीस माझ्या डोळ्यासमोरून, मी तिथेच थांबलो, त्याच वळणावर आणि विचार करत राहिलो. खरंच दोन भेटीमधलं अंतर इतपं बेभरवशाचं असू शकतं?
मागच्या भेटीत खूप सारी स्वप्नं मनात निर्माण झाली आणि पुढल्या भेटीपर्यंत या वाटेवर हा असा अपघात! आता तू किती दूरवर चालत जाशील इथून ठाऊक नाही, पण जाताना तू आपल्या काही आठवणी इथेच सोडून गेलीस. आता त्याच आठवणी माझ्याशी भांडायला येतात आणि मी फक्त हतबल असतो. कारण कुठल्याच प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नसतं. आता फक्त आपल्या उरल्यासुरल्या आठवणी नसल्याचं पाहून लवकर परतणारी सांज, तुझी वाट पाहून माझे थकलेले डोळे या वाटेवर दोन्ही बाजूला आकार घेणारी बाभळी आणि मनात असंख्य वेदना राहतात. त्या असतात आपल्या भेटींच्या, ज्या आता या जन्मात तरी कधीच प्रत्यक्ष उतरणार नाही. हे मनात सलणारं दुःख उराशी घेऊन जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागलोय. संध्याकाळ जाताना आता नवं गाणं देऊन जाते.
बऱयाच भेटी तुझ्या राहून गेल्या,
वाटा बिचाऱया वाट पाहून गेल्या,
बरीच दुःखं मी कधी साहून घेतो,
विरहाचे गीत कधी गाऊन घेतो






























































