महिंद्राची वाहन विक्री 25 टक्क्यांनी तर होंडाची 51 विक्री टक्क्यांनी घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशी वाहन उद्योग महिंद्रा अँड महिंद्राच्या एकूण वाहन विक्रीमध्ये ऑगस्टमध्ये 25 टक्क्यांनी घट झाली आहे. महिंद्राच्या परदेशी वाहन विक्रीत 15 टक्क्यांची तर हिंदुस्थानातील बाजारपेठ 26 टक्क्यांनी घटली. गेल्या वर्षी कंपनीने एकूण 48 हजार 324 वाहने विकली तर या वर्षी ही विक्री कमी होऊन ती 36 हजार 85 वर पोहोचली आहे.

गाडी आणि व्हॅन या प्रवासी वाहनांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी 19 हजार 758 वाहने विकली गेली तर ऑगस्टमध्ये या वर्षी केवळ 13 हजार 507 वाहने विकली गेली. व्यावसायिक वापराच्या वाहनांमध्येही 28 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 20 हजार 326 वाहने विकली गेली तर या वर्षी  14 हजार 684 वाहने विकली गेली. दरम्यान, गणपती आणि दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन मंदीचे हे ग्रहण सुटेल, अशी आशा महिंद्राचे मुख्य विक्री आणि मार्केटिंग अधिकारी राम नकरा म्हणाले.

होंडाची 51 टक्क्यांनी घसरली

होंडा कार इंडिया लिमिटेडच्या गाड्यांच्या एकूण विक्रीत 51 टक्क्यांनी घट झाली आहे. देशी बाजारात गेल्या वर्षी 17 हजार 020 गाड्या विकल्या गेल्या तर या वर्षी 8 हजार 291 गाड्या विकल्या गेल्या. ऑगस्ट महिन्यात वाहनांच्या विक्रीत वाढ होत असते. मात्र ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे वाहन क्षेत्र कोलमडले आहे, असे एचसीआयएलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विक्री आणि मार्केटिंगचे संचालक राजेश गोयल यांनी सांगितले.

मारुतीची विक्री 33 टक्क्यांनी कमी

मारुती सुझुकीची एकूण वाहन विक्री 33 टक्क्यांनी घटली आहे. गेल्या वर्षी मारुतीच्या 1 लाख 58 हजार 189 गाड्या विकल्या गेल्या होत्या तर या वर्षी 1 लाख 6 हजार 413 गाड्यांची विक्री झाली. देशी बाजारातली विक्रीही 34 टक्क्यांनी घटली आहे. मिनी कार असलेल्या ऑल्टो आणि व्हॅगन आर मध्येही 72 टक्क्यांची विक्री झाली आहे. कॉम्पॅक्ट प्रकारातील स्विफ्ट, सेलेरिओ, इग्नाईन, बलेरोमध्ये 24 टक्क्यांनी घट झाली. मारुतीच्या परदेशी बाजारातली विक्री 11 टक्क्यांनी घटली आहे.