‘आई उदे गं अंबे… उदे’, माहूरच्या गडावर घटस्थापना, नवरात्रोत्सवाला प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । माहूर

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी मुळ पीठ असलेल्या श्री रेणुका देवी माहूर गडावर ‘आई उदे गं अंबे’चा जयघोष आणि आरत्याचा सूर अशा प्रसन्न व भक्तीमय वातावरणात बुधवारी घटस्थापना होऊन शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी हजारो भाविकांची मांदियाळी जमली होती.

सकाळी सहा वाजता पासून सनई वादन (नाशिक) वेद घोषात मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महापुजेस प्रारंभ झाला व सकाळी 9 ते 12 च्या दरम्यान श्री रेणुकामातेच्या मुख्य गाभारा व परिवार देवता श्री तुळजाभवानी माता, महालक्ष्मी माता, श्री भगवान परशुराम मंदिरातील घटस्थापना झाली.
श्री रेणुका देवीच्या मुख्य गाभाऱ्यात पंचामृताने अभिषेक करण्यात आला. देवीला नविन वस्त्र परिधान करण्यात आले. शृंगार करण्यात आला. दगडी कुडामध्ये मातुका टाकण्यात येऊन उसाचे पाच धांडे लावून पहिली माळ चढविण्यात आली. त्यानंतर महाआरती करण्यात आली. घटस्थापना श्री रेणुकादेवीचे प्रशासकीय सदस्य विनायकराव फांदाडे व सहकारी चंद्रकांत रिठे व इतर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी गाभाऱ्यात पदसिध्द अध्यक्ष तथा प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष खरात, पदसिध्द सचिव तथा किनवटचे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल (भा.प्र.से), कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिध्देश्वर वरणगावकर, विश्वस्त भवानीदास भोपी, चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, समीर भोपी, श्रीपाद भोपी, आशिष जोशी, सहकारी शुभम भोपी यांची प्रमुख उपस्थिती होती.

घटस्थापनेनंतर छबिना मिरवणूक काढण्यात येवून परिसरातील परिवार देवतांचे पुजन नैवैद्य व आरती व कुमारीका पुजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ.सुजय व सून धनश्री यांनी पहिल्याच दिवशी श्री रेणुकामातेचे दर्शन घेतले. माजी प्रदेशाध्यक्ष (काँग्रेस) माणिकराव ठाकरे यांनीही दर्शन घेतले. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी जहारवाल, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, सपोनि. एस.व्ही.घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गडावर खाजगी वाहनास बंदी असल्यामुळे 80 बसेस मागविण्यात आल्या आहेत. आगार प्रमुख व्हि.टी.धुतमल यांनी प्रत्येक चालक, वाहकास विशेष सूचना देऊन पाहणी करत आहेत.