
सामना ऑनलाईन । नांदेड
राज्यभरात गाजलेल्या 11 कोटीपेक्षा जास्त रक्कमेच्या डांबर घोटाळ्यातील फरार आरोपी मोहम्मद मोईजोद्दीनला पोलीस उपअधिक्षक अभिजित फसके यांनी मोठ्या शिताफीने केली आहे. अटकेनंतर मोईजोद्दीनला न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणात चौथ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.गवळी यांनी मोईजोद्दीनला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
3 सप्टेंबर 2018 रोजी समोर आलेल्या डांबर घोटाळा प्रकरणात मनोज मोरे, भास्कर कोंडा, चंद्रकांत संत्रे या तिघांना पोलीसांनी अटक केली. आजच्या परिस्थितीत त्यांना जामीन मिळालेला आहे. या प्रकरणातील एक कंत्राटदार एस.जी. पद्मावार यांना उच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन दिला. पद्मावार विरुध्द काही दिवसांपूर्वी नव्याने एक गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील एक कंत्राटदार सतीश देशमुख याच्याविरुध्द पोलीसांनी दोषमुक्ती अहवाल पाठवला आहे. इतरांविरुध्द न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
7 महिन्यांपासून फरार असलेला कंत्राटदार महम्मद मोईजोद्दीन महम्मद सलीमोद्दीन याने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी केलेली धडपड कोठेच यशस्वी झाली नाही. मोईजोद्दीनला 49.99 मेट्रीक टन डांबरचे काम देण्यात आले होते. त्याने 69.55 मेट्रीकटन डांबर आणून काम केल्याचे दाखविले. या प्रकरणात शासनाने ठरवलेल्या डांबर कंपन्यांकडून डांबर न आणता इतर ठिकाणाहून डांबर आणले आणि शासकीय कंपन्यांची बिले जोडून निविदेचे बिल घेतले. या डांबर घोटाळ्यात 11 कोटी 63 लाख 82 हजार 566 रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप कंत्राटदारांवर आहे. मोहम्मद मोईजोद्दीनला नांदेड जिल्हा न्यायालयाने त्यांच्या मुलीचे लग्न पार पाडण्यासाठी काही दिवसांचा अंतरीम जामीन दिला होता. पण पोलीसांना मोहम्मद मोईजोद्दीन सापडत नव्हता. अखेर आज दुपारी वाजता पोलीसांनी मोहम्मद मोईजोद्दीनला अटक केली.
पोलीस उपअधिक्षक अभिजित फसके, पोलीस उपनिरिक्षक यु.जी. उगले, पोलीस कर्मचारी अनिल गायकवाड, उमेश राठोड, शिवाजी नाईक आदींंनी अत्यंत शिताफीने पकडलेल्या मोहम्मद मोईजोद्दीनला दुपारी 4 वाजता न्यायालयात आणले.




























































