महाबळेश्वरातील हेरिटेज पाऊलवाटांची देखभाल करा; हायकोर्टाचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाबळेश्वर येथील ब्रिटिशकाळात बांधकाम करण्यात आलेल्या हेरिटेज पाऊलवाटांची दरवर्षी योग्य ती देखभाल करण्यासाठी ठोस पावले उचला, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. राज्यभरातील 10 निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्सनी अॅड. अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेची गंभीर दखल घेत प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.

1862 मध्ये ब्रिटिशांनी बांधकाम केलेल्या पाऊलवाटांना सध्या हेरिटेजचा दर्जा आहे. या पाऊलवाटांची पुरेशी देखभाल करण्याबाबत प्रशासनाला निर्देश द्या, अशी विनंती जनहित याचिकेतून केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करून आपली भूमिका मांडली. महाबळेश्वर येथील 26 राइड्सच्या देखभालीचा प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे पाठवला असून निधी उपलब्ध झाल्यानंतर राइड्सची दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती राज्य सरकारने दिली. त्याची दखल घेतानाच खंडपीठाने प्रत्येक वर्षी पाऊलवाटांची पुरेशी देखभाल करण्याचे निर्देश सरकारला दिले.