
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ड्युटीवर असताना कामाच्या ठिकाणी हजर न राहता श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये स्थानिक महिलेसोबत आढळून आलेले मेजर लीतुल गोगोई यांना ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’त दोषी ठरविण्यात आले आहे.
गेल्या वर्षी दगडफेक करणाऱ्या जमावातील एका तरुणाला लष्कराच्या जीपला बांधल्याप्रकरणी मेजर गोगोई चर्चेत आले होते. फुटीरवादी, माथेफिरूंकडून होणाऱया दगडफेकीपासून बचावासाठी जीपला बांधून मानवी ढाल केल्याबद्दल कौतुकही झाले होते. मात्र 23 मे रोजी श्रीनगरमधील एका महिलेसोबत मेजर गोगोई गेले होते. त्यांच्याबरोबर एक तरुणही होता. यावेळी हॉटेल कर्मचाऱ्यांबरोबर वादावादीही झाली होती. याप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाने ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमली. या समितीने गोगोई यांना दोषी ठरविले आहे.
जवानांसाठी काटेकोर नियम
लष्करात जवान आणि अधिकाऱ्यांसाठी कडक नियमावली आहे.
कोणताही अधिकारी आणि जवान आपली डय़ुटी सोडून कुठेही जाऊ शकत नाही.
जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनशील राज्यात वरिष्ठांच्या परवानगीशिवाय डय़ुटी नसतानाही बाहेर जाता येत नाही.
जम्मू-कश्मीरात नागरिकांबरोबर खुलेआम भेटता येत नाही.
summary- major gogoi found guilty in hotel case
























































