
सामना प्रतिनिधी । मुंबई
डोंगरी येथील कैसरबाई इमारत दुर्घटनेनंतर शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी कायदा करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही आज तत्काळ बैठक बोलावून मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या बांधकामांचा सर्व्हे करून बेकायदा बांधकाम करणार्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आज दिले. तसेच मुंबईतील धोकादायक इमारतींचा क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यासाठी कायदा करण्याच्या सूचना दिल्या.
डोंगरी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी मंगळवारी भेट घेतली होती. याला तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली. या बैठकीत त्यांनी मुंबईतील मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतींचा आढावा घेतला. मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत त्यांचे क्लस्टर करून तसेच पुनर्विकासातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वंकष कायदा करण्याबाबत निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सध्या जे रहिवासी अशा इमारतीत राहताहेत त्यांच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करणे तसेच तसे न करता आल्यास दोन वर्षांचे भाडे देणे तसेच रिट ज्युरिडिक्शन वगळता अन्य सर्व कायदेविषयक गतिरोध दूर करणे अशा ठोस तरतुदी करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
म्हाडामार्फत पुनर्विकास
उपकरप्राप्त ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत त्यांचे क्लस्टर घोषित करायचे. अशा इमारतींचा पुनर्विकास करताना अडथळे येऊ नयेत यासाठी कायदा तयार करण्यात यावा. त्यानंतर अशा मोडकळीस आलेल्या इमारती तोडून म्हाडाच्या माध्यमातून अशा इमारतींचा पूर्णपणे विकास करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे
मुंबईतील अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतींचा सर्व्हे करून अनधिकृत बांधकाम करणार्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. बैठकीला गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार अमीन पटेल, विनोद घोसाळकर यांच्यासह महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे आदी यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
या दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. ‘मुंबईतील डोंगरी भागात घडलेली ही दुर्घटना अत्यंत दुःखदायक आणि भीषण आहे. ज्यांनी आपल्या आप्तांना, नातेवाईकांना गमावले त्यांच्याप्रति आपल्या मनात शोकभावना आहे’, अशा शब्दांत पंतप्रधानांनी ट्विटरवरून भावना व्यक्त केल्या आहेत.
इमारत कोसळली त्या इमारतीच्या तळमजल्यावर एक दुकान आहे. रात्रीचे काम आटोपल्यानंतर तेथे काम करणारे कर्मचारी दुकानात झोपले होते. मध्यरात्री दुकानातील सिलिंगचा काही भाग कोसळला. त्यामुळे कर्मचारी दुकानाबाहेर झोपायला आले होते. दुकानात सिलिंग पडल्याचे कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांनादेखील सांगितले.





























































