
>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
नवरात्र म्हणजे स्त्रिया आणि मुलींना नटण्याचे छान निमित्त. नवरात्री हा उत्सव साजरा करण्यासाठी नवनवीन कपडे घालून तयार होताना, तसेच गरबा किंवा दांडिया खेळायला जाताना मेकअप कसा करावा, असा प्रश्न अनेकींना पडलेला असतो. प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जाणेही शक्य नसते. अशा वेळेस थोडा थोडका का होईना, पण स्वतःला मेकअप यायलाच हवा.
दांडिया म्हटले की, मग भरपूर मेकअप असा काही गैरसमज असतो. भरपूर ज्वेलरी, अगदी भरलेला ड्रेस हे सगळे असताना फार हेवी मेकअपची आवश्यकता नसते. फक्त हा मेकअप रात्री करायचा असल्यामुळे काही मेकअपच्या वस्तूंचा फक्त जास्त वापर करावा लागतो. कारण ज्वेलरी, ड्रेस यामुळेच आपला मेकअप लुक खुलत असतो, पण त्यासाठी हेवी मेकअप न करता परफेक्ट स्किन टोन फाऊंडेशन मेकअप केल्यास तो जास्त सुंदर दिसतो.
अलीकडे नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ रंग घालण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्यामुळे या नऊ रंगांतले कपडे, त्याला मॅचिंग ज्वेलरी, मोजडी खरेदी करण्याकडे महिलांचा कल असतो. तसेच जर दांडिया किंवा गरबा खेळायला जायचे असेल तर मात्र त्याला आणखीच उधाण येते. हाच आनंद द्विगुणीत व्हावा म्हणून मेकअपच्या काही टिप्स मी आपल्याला देणार आहे.
काय कराल
प्रथम डोळय़ांच्या लेन्स लावून घ्याव्यात. लेन्समुळे डोळय़ांचा मेकअप जास्त उठून दिसतो. त्यानंतर चेहरा क्लीन करून क्लिनिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग करून झाल्यावर प्रायमर लावून घ्यावे. त्यानंतर कन्सिलर लावून घ्यावे. कन्सिलर लावून झाल्यावर स्किन टोनप्रमाणे फाऊंडेशन लावावे. फाऊंडेशन लावताना पूर्ण फाऊंडेशन व्यवस्थित स्मज करून घ्यावे. फाऊंडेशन पूर्ण ब्लेंड झाल्यानंतर त्यावर स्किनप्रमाणेच पावडर लावावी. यासाठी कॉम्पॅक्ट पावडरचा वापर न करता लूज पावडरचा वापर करावा. तसेच त्यानंतर चेहऱयावर जिथे गरज आहे तिथे काँटय़ुरिंग करून घ्यावे. व त्यानंतर
डोळय़ांचा मेकअप करण्यास घ्यावा.
डोळय़ांचा छान मेकअप
डोळय़ांचा मेकअप तुम्हाला जेवढा छान करता येईल तेवढा करा. ड्रेसेसच्या रंगाप्रमाणे आयशॅडोचा वापर करा किंवा वेगवेगळे आयशॅडो लावण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळय़ा विंग आय लाइनरचा वापर तुम्ही या डोळय़ांच्या मेकअपमध्ये करू शकता. तसेच आय लाइनरचा वापर करताना वॉटरप्रूफ आय लाइनरचाच वापर करा. तसेच मस्काराही वॉटरप्रूफ वापरा. घामामुळे ते पसरणार नाही. डोळय़ांमध्ये वॉटरप्रूफ काजळचा वापर करावा. काजळामुळे डोळे जास्त उठून दिसतील.
– ब्लशर लावताना थोडे हेवी ब्लशर लावा. तसेच हायलाइट लावतानाही थोडे हेवी हायलाइटर करण्याचा प्रयत्न करा. लिपस्टिक लाँग लास्टिंग असेल असा प्रयत्न करावा. नाकाला छान काँटुर करून घ्यावे. तसेच ज्वालाइन ब्रॉड असल्यास त्यावरही व्यवस्थित काँटय़ुरिंग करून घ्यावे. दांडिया आणि गरब्यासाठी कपाळावर तसेच हनुवटीवर, हातांवर वेगवेगळय़ा टिकल्या किंवा गोंदण केल्यासारखे टॅटू काढण्याचीही पद्धत आहे.
अशा रीतीने योग्य ड्रेस, दागदागिने वेगवेगळय़ा प्रकारच्या टिकल्या, मेकअप करून तुम्ही तुमच्या नवरात्रीतील गरब्याचा, दांडियाचा आनंद लुटू शकता.



























































