यूपीआयच्या माध्यमातून दुकानदारांची फसवणूक; दिवसाला तीन दुकाने टार्गेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वस्तू खरेदी केल्यावर ऑनलाइन यूपीआयच्या माध्यमातून पैसे दिल्याचा खोटा मेसेज दाखवून फसवणूक करणाऱया दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली. सुलभसिंह परिहार आणि अनिल कुमार गौतम अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीच्या पैशांतून ते ब्रॅण्डेड वस्तू खरेदी करीत असत.

मालाडच्या मामलेदारवाडी येथे एक कपडय़ाचे दुकान आहे. गेल्या जुलै महिन्यात दोघेजण दुकानात आले होते. तेव्हा व्यावसायिक हे दुकानात नव्हते. त्या दोघांनी साडेसात हजार रुपयांचे कपडे खरेदी केले. दोघांनी यूपीआय ऍपवरून पैसे पाठवले तेव्हा दुकानात काम करणाऱया नोकराने व्यावसायिकाला फोन करून ‘‘पैसे आले का?’’ अशी विचारणा केली. प्रवासात असल्याने व्यावसायिकाने ‘‘त्या दोन ग्राहकांना थांबवून ठेव’’ असे सांगितले. मात्र त्या दोघांनी पैसे पाठवल्याचा क्रीनशॉट नोकराला दाखवून पळ काढला. फसवणुकीची रक्कम कमी असल्याने त्याने पोलिसांत तक्रार केली नव्हती.

शनिवारी दुपारी दोघेजण एका दुकानात खरेदीसाठी आले. त्याने साडेदहा हजार रुपयांचे कपडे खरेदी केले. पैसे पेड झाल्याचा ते मेसेज दाखवून निघणार होते तेव्हा व्यावसायिकाच्या दुकानात काम करणाऱया जुन्या नोकराने त्या दोघांना ओळखले. याची माहिती व्यावसायिकाला दिली. व्यावसायिकाने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक रवी अडाणे यांच्या पथकातील उपनिरीक्षक वायकोस, राऊत यांनी तपास सुरू केला. फसवणूक करणाऱया सुलभ आणि अनिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. अनिल हा मुख्य सूत्रधार असून त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाइल हस्तगत केला आहे. त्याच्या मोबाइलमध्ये काही पैसे पाठवल्याचे क्रीनशॉट आढळून आले आहेत. फसवणुकीच्या पैशांतून ते ब्रॅण्डेड कपडे घ्यायचे. त्यामुळे त्या दोघांवर कोणी संशय घेत नव्हते. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

अशी करायचे फसवणूक

अनिल आणि सुलभ हे कांदिवली परिसरात राहतात. ते दिवसाला तीन दुकानांना टार्गेट करतात. दोघे वस्तू खरेदी केल्यावर यूपीआय ऍपवर चुकीचा पिन टाकत असत. चुकीचा पिन टाकल्यावर त्याचा ते क्रीनशॉट घेत असत. तो क्रीनशॉट एडिट करायचा. पैसे पेड केल्याचा मेसेज फक्त ते दाखवत असत. या दोघांनी मुंबईत अनेक दुकानदारांना चुना लावल्याचे तपासात समोर आले आहे.