मालाडचे हार्बर स्थानक एलिवेटेड! हार्बरच्या बोरिवलीपर्यंतच्या विस्ताराचे काम सुरू होणार

सध्या सीएसएमटी ते गोरेगावपर्यंत जाणाऱया हार्बर मार्गाचा विस्तार आता पश्चिम रेल्वेच्या बोरिवलीपर्यंत करण्याची योजना आखण्यात आली असून जागेअभावी मालाडचे स्थानक एलिवेटेड म्हणजे उन्नत स्वरूपात बांधण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे मालाड हे पहिलेच उन्नत स्थानक ठरणार असून तेथे आयलँड स्वरूपात प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहेत. या योजनेसाठी 1883 चौरस मीटरची जागा लागणार आहे. सध्या मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील किंग्जसर्कल, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड रोड आणि सँडहर्स्ट रोडनंतर पश्चिम रेल्वेचे मालाड हे पहिलेच एलिवेटेड स्थानक ठरणार आहे.
सध्या सीएसएमटीवरून हार्बरच्या प्रवाशांना गोरेगावपर्यंतच प्रवास करता येतो. हार्बरचा विस्तार गोरेगावपर्यंत करण्यासाठी एप्रिल 2018 उजाडावे लागले. अंधेरी ते गोरेगाव हार्बरच्या मूळ योजनेची घोषणा 2009 मध्ये करण्यात आली होती, परंतु कामे पूर्ण करायला डिसेंबर 2017 पर्यंतची वाट पाहावी लागली. प्रत्यक्षात एप्रिल 2018 मध्ये गोरेगावपर्यंत हार्बर लोकल धावायला लागली. आता हार्बरचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याची योजना मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प 3 (अ) अंतर्गत आखण्यात आली असून त्यासाठी 825.58 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा प्रकल्प पश्चिम रेल्वे पूर्ण करणार असून सध्याच्या गोरेगाव ते बोरिवली मार्गाच्या पश्चिम बाजूला रेल्वेच्या वाहतुकीला कोणतीही बाधा न आणता हे काम केले जाणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या लोकलची गर्दी विभागली जाणार
सध्या पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि बोरिवलीचा विभाग अत्यंत गर्दीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. येथे लोकल गाडय़ांना सर्वाधिक गर्दी असते. जर हार्बरचा विस्तार अंधेरी ते बोरिवलीपर्यंत झाला तर प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन पश्चिम रेल्वेच्या गाडय़ांची गर्दी त्यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पश्चिम रेल्वेने 13 कन्सलटंटची छाननी केली असून त्यातील एकाची निवड होऊन त्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर टेंडरची प्रक्रिया सुरू होणार आहे.

2.6 कि.मी.चा एलिवेटेड रेल्वेमार्ग
सध्या मालाड स्थानकात चार प्लॅटफॉर्म आहेत. त्यातील दोन धीम्या तर दोन जलद अप डाऊन मार्गासाठी आहेत. मात्र मालाडमध्ये ट्रक टाकायला जागा नसल्याने येथे 300 मीटर लांबी आणि 10 मीटर रुंदीचा उन्नत स्वरूपाचा आयलँड प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे. गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान 2.6 कि.मी.चा एलिवेटेड कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. पुलासाठी 145 कोटींचा तर मालाड स्थानकासाठी 65 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तेथील एक खासगी दुमजली इमारत तसेच पालिकेचा पादचारी पूल तोडावा लागणार आहे. तसेच रेल्वेच्या काही मालमत्ता हलविण्यात येणार आहेत. सध्याच्या रेल्वेच्या पादचारी पुलाचा विस्तार करावा लागणार असून प्रवाशांना एलिवेटेड स्थानकात शिरण्यासाठी सरकते जिनेही बसविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या