
हिंदुस्थानच्या हद्दीत लक्षद्वीप बेटाजवळ पिग्मी ब्लू देवमाशाचे गायन रेकॉर्ड करण्यात संशोधकांना यश आले आहे. त्यामुळे देवमाशाची ही प्रजाती गाते, हे सिद्ध झाले आहे. तसेच आपल्या समुद्र हद्दीत या दुर्मिळ देवमाशाच्या अस्तित्वावरही शिक्कामोर्तब झाले आहे.
पिग्मी ब्लू व्हेल ही देवमाशाची अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे. युवा सागरी संशोधक दिव्या पानिकर हिने लक्षद्वीप बेटावरील देवमाशांच्या प्रजातीचा अभ्यास केला. 2015 सालापासून ती सखोल संशोधन करत असून तिने लक्षद्वीपवर इतिहासात पहिल्यांदाच पिग्मी ब्लू व्हेलच्या गाण्याचे रेकॉर्डिंग केले आहे
दिव्याने 2018 साली सी डायवर्सच्या मदतीने वकरत्ती बेटाजवळ खोल समुद्रात मायक्रोफोन लावले. बेटांच्या दोन टोकांना वेगवेगळे मायक्रोफोन ठेवले गेले. या मायक्रोफोन्समध्ये देवमाशाचा आवाज रेकॉर्ड झालाय. यावरून पिग्मी ब्लू देवमासे लक्षद्वीप बेटांजवळच्या समुद्रात वास्तव्य करतात हेदेखील सिद्ध झालंय. त्यांच्या संवर्धनाची गरज आता निर्माण झालीय.
























































