
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील हरीश रुग्णालयात एका वॉर्डबॉयने आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एका विवाहीत महिलेवर बलात्कार केल्याच धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.
चिराग यादव असे आरोपीचे नाव आहे. हा ढकीबांधडा येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी एका महिलेला हरीश रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना फुफ्फुसात संसर्ग असल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री 3.30 च्या सुमारास चिराग नावाचा वॉर्डबॉय अचानक आयसीयूमध्ये शिरला आणि त्याने महिलेसोबत अश्लील चाळे करायला सुरुवात केली. वासनेने हपापलेल्या चिरागने महिलेला नशेचे इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार केला. काही वेळाने तरुणी शुद्धीत आल्यावर तिला घडलेल्या प्रकाराबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी चिरागने दिली. त्यावेळी तेथे एक परिचारीका आली परंतु मदत करण्याऐवजी तिनेही महिलेला धमकावले.
हरीश रुग्णालयात घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यात चिराग त्या महिलेच्या जवळ जाताना स्पष्टपणे दिसत आहे. रुग्णालयाचे संचालक लवेश गुप्ता यांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले असून पोलिसांनी चिरागला अटक केली आहे.
























































