
>> मलिका अमरशेख
कुठल्याही महानगरात एकही झोपडी नसेल तेव्हाच आपण खऱया अर्थानं महान होऊ! शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मोफत-एकही औषध मिळत नाही-महाग आहे असं एकही औषध नसेल व रोग्याला गावात असो वा शहरात, पाच मिनिटात उपचार मिळेल – एकही मूल कुपोषणग्रस्त नसेल – एकही घर असं नसेल जिथं अन्न नाही तर तो देश, ते गाव, ते शहर खरोखरच महान-नंदनवनच! पण त्यासाठी जसं शासन कटिबद्ध तसंच प्रत्येक नागरिकही जबाबदारीची, कर्तव्याची, स्वच्छतेची सचोटी सज्जनता व बंधुता याची जाण असणारा हवा, तरच हे शक्य आहे.
कोरोनाच्या महासंकटातून जातोय न् जातोय तोच निसर्गाचं अस्मानी संकट कोसळलं न् मृत्यूचं तांडव सुरू झालं! बचावकार्य… सरकारी मदत… सुरू झाली तरी पण या सर्वांपाठचा मूळ मुद्दा कुणी विचारात फारसा घेतला नाही. पण मुखवटे सोलायचेच असं ठरल्यावर या सर्वांमागचं कारण काय हेच शोधायचा प्रयत्न आहे.
या सर्वांमागचं खरं कारण आपणच आहोत! माणसाचा हव्यास… आसुरी हाव. भस्मासुराची गोष्ट आपण विसरलोत… डोंगर का खचतात… कडे का कोसळतात… पूर का येतात त्याच एकच उत्तर- आपण! जंगलतोड करतोय… वृक्षतोड करतो… डोंगरातून ते पोखरून रस्ते बांधतो… विहिरी… पाइपलाइन… हे सर्व करताना स्फोटकांचाही वापर करतो… आजूबाजूच्या धरणाच्या पाण्याचा पण प्रचंड दाब… या सगळय़ा कारणांनी डोंगर पायापासून कमकुवत होत जातो… वृक्षांची मूळं… खडक उघडे पडतात… या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन अवघड कठीण न् अभेद्य तटबंदीगत दिसणारे महाकाय डोंगर ठिसूळ होऊन त्याचे कडेकपार सैल होत जातात. न् मुसळधार पावसाच्या माऱयानं ते कडे सहजगत्या तुटून कोसळतात… – तर हे झालं माळीण, तळिये, आंबेगाव या दरडमृत्यू होऊन आलेल्या गावांबद्दल. पण चिपळूण, कोल्हापूर या गावांत आलेले महापूर याचंही कारण मानवी हव्यासच आहे. पाण्याचा निचरा होण्याच्या ठिकाणी बांधलेली बांधकामं, मोठाले रस्ते बांधतानाही पाण्यासाठी कॅनॉल न ठेवणं… याचा अपरिहार्य परिणाम पाणी साचून राहतं. त्यातच जर भरपूर पावसामुळे जलसाठा वाढला तर आजूबाजूंच्या धरणाचे दरवाजे उघडले जातात. परिणामी पाण्याचा प्रवाह वेग, दाब अधिकच वाढून पूरपातळीही वाढते.
आणि एक नजर जरा जगावर टाकलीत तर लक्षात येईल की, सर्वच जगभरात हे भूस्खलन – महापूर येऊ लागलेत. ही धोक्याची घंटा आहे. चीनमध्येही महापूर आलेला आहे. तर हिमालयाची रांगही एक आपली अतिसंरक्षक तटबंदी म्हणून ओळखली जाते. पण ती एक विभागीय फटीवर उभी असल्याने तिथं सतत बर्फाचे कडे तुटणे… सरकणे चालू असते.
जिथं पाऊस पडण्याची अजिबात शक्यता नाही तिथं पाऊस सुरू झालेला आहे. नामिबिया, मक्का, कतार – अगदी आपल्याकडे राजस्थानातही पाऊस सुरू झालाय… एकंदरीत जगभरातलं मोसमी हवामान तापमानाचं गणितच बदललंय न तेही अर्थातच आपल्या सर्वांच्या निसर्गाच्या अनन्वित संहारामुळे -इमारती, फर्निचर, कागद, औषधी, व्यवसाय यासाठी जंगलतोड भरमसाट केलेलीच आहे. शहरांमधून, गावामधून रस्ते, पूल यासाठी डेंगर पोखरले तरी आहेत आणि नदीच्या पात्रातून वाळू चोरीला जाऊन नदीमध्येही भराव टाकले आहेत. या सर्वांचा परिणाम निसर्गाचा समतोल बिघडला आहे. न् शेवटी याचा शेवट भस्मासुराप्रमाणे आपल्याच माथ्यावर कोसळणार… हा कसला विकास? हा तर जग भकास करण्याचा अजेंडा आहे. धरणाच्या भिंती, पुलांची बांधकामं आणि डोंगर -ज्याच्या पायथ्याशी गावं वसलीत यांचं सर्वांचा एक सर्व्हे-जसं इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट होतं तसं दरवर्षी पावसाळय़ाआधी व्हायला हवं.
– तिसरं कारण जे आहे. ते जिथं जिथं जमिनीच्या प्लेट्स कमकुवत आहेत तिथं तिथं त्या एकमेकांना घासतात. सरकून एकमेकींना रेटतात. एका प्लेटवर दुसरी प्लेट सरकून चढते तेव्हा भूकंप होतात. अशा फॉल्टी प्लेटस् जपानकडून आपल्या उत्तराखंड वगैरेकडे येतात. तसच कोयना धरणाकडे व चिपळूणकडे पाण्याच्या दाबाने किंवा सरकत्या प्लेटमुळे अनेक भूकंपाचे धक्के बसतात. पण ते रिश्टर स्केलच्या 2 किंवा 3 पर्यंत असले की जाणवत नाही व ते सांगितलेही जात नाही. ते दखलपात्र धरत नाही, पण त्याचा परिणाम इमारती, जमीन, डोंगर यांना होतोच की!
– डोंगरपायथ्याच्या गावांना पठारावर नव्याने वसवावं, तसंच पावसाळय़ात एक महिना आधी शासनाकडून व विविध सामाजिक संस्थांना मदतीला घेऊन पाण्याखाली जाणाऱया भागांमधील रहिवाशांना त्वरित मदत व बचाव मिळेल अशा जागा व साधने तयार ठेवली तर नंतरची भयावह स्थिती निर्माण होणार नाही.
चौथी गोष्ट आहे महानगरातली. मुंबईजवळ अनेक घरं दरडीवर चढणावर वसलेली आहेत. दुर्दैव असं की, त्यांना धोक्याचे इशारे, नोटिसा देऊनही लोक ऐकत नाहीत. ‘कामावर जायला लांब पडतं’, ‘मुलांच्या शाळा’, ‘प्रदूषण’ असली कारण देतात तेव्हा काय बोलावं कळत नाही.
उद्या भिंत किंवा दरड कोसळली तर कामावर कधीच न जाता डायरेक्ट जमिनीच्या आत राहायला जाल की! लोक पुण्याहून मुंबईला नोकरीला येतात! न् यांना जिथं धोका आहे तिथंच राहायचंय! उद्या दरड कोसळल्यावर पुन्हा शासन व वनखात्याच्या नावानं आरडाओरडा करायला तयार!
हे जे चुकीचं वागतात त्यांना कायद्याचा बडगा दाखवूनच त्यांचं पुनर्वसन करावं. अर्थात पुनर्वसन करण्याच्या जागाही राहण्यायोग्यच हव्यात. पाणी, वीज, वाहतूक, नाले स्वच्छता हे सारे तिथं हवंच.
कुठल्याही महानगरात एकही झोपडी नसेल तेव्हाच आपण खऱया अर्थानं महान होऊ! शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मोफत-एकही औषध मिळत नाही-महाग आहे असं एकही औषध नसेल व रोग्याला गावात असो वा शहरात, पाच मिनिटात उपचार मिळेल – एकही मूल कुपोषणग्रस्त नसेल – एकही घर असं नसेल जिथं अन्न नाही तर तो देश, ते गाव, ते शहर खरोखरच महान-नंदनवनच! पण त्यासाठी जसं शासन कटिबद्ध तसंच प्रत्येक नागरिकही जबाबदारीची, कर्तव्याची, स्वच्छतेची सचोटी सज्जनता व बंधुता याची जाण असणारा हवा, तरच हे शक्य आहे.



























































