
काँग्रेसमध्ये ज्यांना सगळे मिळाले, ते पक्ष सोडून गेले आहेत, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता केली. तसेच जमिनीवर काम करणारे नेते, कार्यकर्ते पक्षाबरोबर आहेत. हीच ताकद पक्षासाठी आजच्या परिस्थितीत महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले.
कॉर्पोरेट कंपन्यांना पाहिजे तसे कायदे बनवून भाजपने त्यांना फायदा मिळवून दिला. त्याबद्दल त्या कंपन्यांनी भाजपला निवडणुकीसाठी मोठय़ा प्रमाणात काळा पैसा दिल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला. सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा उघडला असून, इलेक्टोरल बॉण्ड रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला न्याय दिल्याची भावना यावेळी खरगे यांनी व्यक्त केली.
लोणावळय़ामध्ये प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरात खरगे यांनी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आदी आमदार, वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.


























































